भुईबावडा घाटात ढगफुटी सदृश पाऊस

दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 23, 2024 14:52 PM
views 359  views

वैभववाडी : तालुक्यातील भुईबावडा घाट परिसरात आज ता.२३सायंकाळी ढगफुटी सदृश पाऊस झाला.  मुसळधार पावसामुळे  भुईबावडा घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे घाटातील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. ही वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली होती.

  तालुक्यात आज सकाळपासून पावसाचे वातावरण होते. दुपारनंतर संततधार पावसाला सुरूवात झाली. सायकांळी पावसाचा जोर अधिक वाढला व भुईबावडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. या भागात सुमारे तासभर मुसळधार पाऊस कोसळत होता. घाटातही जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे घाटात रस्त्यावर गुडघाभर पाणी आले होते.या पावसाचा तडाखा घाटमार्गाला बसला आहे.घाटातील दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. मातीचा मोठा भाग रस्त्यावर आला आहे. ‌त्यामुळे भुईबावडा- गगनबावडा मार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली. ही वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

घटनेची माहीती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल पथकासह घाटात दाखल झाले. घाटामार्गात अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत .तसेच दरडी हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा जेसीबी घटनास्थळी दाखल झाले होते .जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याच काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.