LIVE UPDATES

भोसले सैनिक स्कूल भावी नेतृत्व घडविणारी कार्यशाळा

परिचय - मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 21:07 PM
views 12  views

सावंतवाडी : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने शाळेच्या शिस्तबद्ध, संस्कारमय आणि नेतृत्वकेंद्री वातावरणाची माहिती यावेळी देण्यात आली.


कार्यक्रमाला भोसले नॉलेज सिटीच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, संस्थेचे सीईओ तथा शाळेचे कमांडंट ले. कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस व डे बोर्डिंग विभागाच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई उपस्थित होत्या. प्रास्ताविकात सोनाली शेट्टी यांनी सैनिक स्कूलमधील  शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, स्वावलंबन आणि राष्ट्रप्रेम विकसित करणारी जीवनशैली असल्याचे सांगितले. प्रियांका देसाई यांनी सैनिक स्कूल मान्यता प्राप्तीचा प्रवास आणि आगामी वाटचालीवर प्रकाश टाकला, तर सॅव्हिओ फर्नांडिस यांनी नव्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन, शाळेचे नियम आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी पालकांना दिला. ले.कर्नल रत्नेश सिन्हा यांनी भोसले सैनिक स्कूल ही भावी नेतृत्व घडविणारी कार्यशाळा असल्याचे सांगितले, तर सुनेत्रा फाटक यांनी सैनिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचा समारोप प्राची कुडतरकर यांनी आभार प्रदर्शनाने केला.