
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटित, असंघटिक क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच जिल्ह्यातील घरेलू कामगारांना शासन आदेशानुसार संसार उपयोगी भांडी संच मिळावा यासाठी प्रयत्न केला जाईल असे, मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय मजदूर संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधींना अश्वासित केल्याची माहिती जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटित, असंघटिक क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांची आज ओम गणेश निवास कणकवली येथे भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, कोकण विभाग संघटनमंत्री भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब व जिल्हा कोषाध्यक्ष ओमकार गुरव उपस्थित होते.
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदीत असलेल्या घरेलू कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अनेक जिल्ह्यात संसार उपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यात आले आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऑगस्ट २०२४ अखेर पर्यत १,४९५ एवढे घरेलू कामगार आजही भांडी संच्यापासून वंचित असल्याचे पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांचे प्रलंबित लाभ प्रस्ताव, कंत्राटी कामगार कायद्याची अमंलबाजावणी, अशा प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करून न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री यांना विनंती करण्यात आली असता, पालकमंत्री नितेश राणे यांनी संघटित,असंघटिक क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघास सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे अश्वासित केल्याची माहिती जिल्हा सचिव.श्री परब यांनी दिली.