
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाच्या राज्य कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भरत सडक गावडे यांची राज्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. राज्य अध्यक्ष वि. ना. लांडगे (सातारा), सचिव पांडुरंग सुतार (सातारा), संपादक पदी गणेश देशपांडे (सोलापूर) यांचीही निवड करण्यात आली आहे.
भरत गावडे १९९६ सालापासून संघात कार्यकत असून एकूण तीन राज्यस्तरीय कृतिसत्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करून त्यांनी यशस्वी केली आहेत. मराठी भाषा समृद्धी व विकास यासाठी ते सतत शाळा, महाविद्यालयांत विविध उपक्रम राबवित असतात. मराठी भाषेचे तज्ज्ञ मार्गदर्शक, साधनव्यक्ती म्हणून राज्य, विभाग व जिल्हास्तरावर ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
'मराठी भाषा विकास कौशल्य' या उपक्रमा अंतर्गत भरत गावडे यांनी आतापर्यन्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात व अन्य ठिकाणी अनेक शाळांत मार्गदर्शन केले आहे. 'वाचन संस्कृती' वाढविण्यासाठी आतापर्यंत माध्यमिक व प्राथमिक शाळात ते विविध उपक्रम राबवित आहेत. तसेच राज्य, जिल्हा निबंध लेखन स्पर्धेत त्यांनी यश मिळविले आहे. वाचक मेळावे, प्रशिक्षण वर्ग, निवडश्रेणी, बदलती पाठ्यपुस्तके यांबाबत मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षात मराठी त्रैमासिकचे संपादक म्हणून यशस्वी कार्य केले असून या सर्वच कार्यांचा विचार करून श्री. गावडे यांची राज्य कार्यकारिणीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबाबत सर्वच स्तरावरून अभिनंदन केले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मानाचे पद मिळाले असल्यामुळे राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर तसेच जिल्हा अध्यापक संघाच्या वतीने गावडे यांचे अभिनंदन करण्यात आले.