
कुडाळ : भडगाव येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून दलित वस्तीवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, या अन्यायाच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा ग्रामस्थ संजय अंबारे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे.
निवेदनानुसार, ग्रुप ग्रामपंचायत भडगाव येथील सरपंच, ग्रामसेवक आणि एका सदस्याने संगनमताने भडगाव खुर्द येथील दलित वस्तीमधील कामासाठी शासनाकडून मिळालेला निधी रद्द केला. कागदपत्रांची अपूर्तता असल्याचे कारण दाखवून हा निधी रद्द करण्यात आला, असे अंबारे यांनी म्हटले आहे. भडगावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कोणताही पाठपुरावा न केल्यामुळे दलित वस्तीवरील कामासाठी मंजूर झालेले रु. २,५७,८६०/- इतका निधी रद्द झाला, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
हा विषय ग्रामसभेत आल्यानंतर त्यावर ठराव घेण्यात आला. तसेच, ग्रामपंचायतीच्या इतिवृत्ताची मागणी ग्रामसभेत केली असता, ७ दिवसांत इतिवृत्त देण्याचा ठराव मंजूर झाला होता. मात्र, ७ दिवसानंतर इतिवृत्त मागण्यासाठी गेले असता, सरपंच आणि ग्रामसेवकांनी ते देण्यास नकार दिला, असे अंबारे यांनी सांगितले. हे लोक अशाच प्रकारे आपल्या अधिकारांचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांना सातत्याने त्रास देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ संजय अंबारे यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाची हाक दिली आहे.