कोट्यावधी निधीचा लाभ थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात

भारतीय मजदूर संघ प्रदेश सचिव हरी चव्हाण यांची माहिती
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 05, 2024 11:49 AM
views 29  views

मालवण : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ (महाराष्ट्र शासन) या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने नोंदीत बांधकाम कामगारांच्या थेट खात्यात विविध आर्थिक योजनेंतर्गत मागील दोन वर्षात सुमारे 6 कोटी 44 लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय मजदूर संघातर्फे जिल्ह्यातील घरेलू कामगारांना सन्मान धन, आर्थिक मदत व गृहपयोगी संच मिळण्यासाठी ही महाराष्ट्र शासनाकडे यशस्वी पाठपुरावा सुरु असून त्यालाही लवकरच यश येईल. अशी माहिती भारतीय मजदूर संघ प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी मालवण येथील कार्यालयात दिली आहे. 

राष्ट्र हित, स्थिर सरकार आणि कणखर नेतृत्व देशात लाभले पाहिजे. असेही चव्हाण यांनी या निमित्त सांगितले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळा मार्फत शैक्षणिक लाभ, प्रसूती लाभ, 75 टक्के अपंगत्व, कामगार प्रथम विवाह तसेच कामगारांच्या एका मुलीच्या लग्नासाठी 51 हजार तसेच गंभीर आजार व मृत्यू क्लेम या अंतर्गत बांधकाम कामगारांच्या तसेच त्यांच्या वारस खात्यात थेट लाभ जमा करण्यात आला आहे. राज्यात लाखोंच्या पटीत तसेच जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने असलेल्या नोंदीत कामगार कुटुंबाना लाभ मिळाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. 

शासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या सर्व योजना थेट कामगारांपर्यंत पोहोचवून त्यांना अधिकाअधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे हरी चव्हाण यांनी यानिमित्ताने सांगितले. लोकसभा निवडणुकीत येणाऱ्या 7 मे रोजी जिल्ह्यातील सर्व कामगारांनी राष्ट्रहित स्थिर सरकार आणि कणखर नेतृत्व यासाठी घराबाहेर पडून 100 टक्के मतदान करावे असे आवाहन हरी चव्हाण यांनी केले आहे. 

दोन वर्षात मिळालेले लाभ

जिल्ह्यातील हजारो नोंदीत कामगारांच्या पाल्याना शैक्षणिक लाभ अंतर्गत दोन वर्षात 5 कोटी 38 लाख 39 हजार 855 निधी वितरित झाला. कामगार मृत्यू क्लेम अंतर्गत वारसांना 24 लाख 68 हजार, तसेच प्रसूती लाभ, अपंगत्व, गंभीर आजार, विवाह, मुली विवाह या अंतर्गत 2 वर्षात 81 लाख 63 हजार असे एकूण दोन वर्षात 6 कोटी 44 लाख 70 हजार 855 रुपये थेट खात्यात वितरीत करण्यात आले आहेत.