बेळगावी बँक अभ्यास गटाने सिंधु बँक IT विभागाचे केले कौतुक

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 21, 2025 19:16 PM
views 14  views

सिंधुदुर्ग : बेळगांवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे, संचालक मंडळ व वरीष्ठ अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाला अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने दि.२१ जानेवारी २०२५ रोजी भेट दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मनीष दळवी यांनी अभ्यास दौऱ्यातील सदस्यांचे स्वागत करुन त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गोमय गणेशमुर्ती भेट दिली. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या आयटी विभागाने बँकींग सेवा, सुविधा चांगल्या पद्धतीने ग्राहकाभिमुख केलेल्या असून अभ्यासगटाने आयटी विभागाची रचना, कामकाज पद्धत तसेच डिजिटल सुविधेबाबत माहिती घेतली. अभ्यास दौऱ्यातील सदस्यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती घेत असतांना जिल्हा बँकेच्या आयटी विभागाने डिजीटल बँकींगमध्ये नवनवीन सुविधांचा अवलंब केला असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या शासकीय योजना, सिंधुदुर्ग बँकेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध वाढीसाठी केलेले प्रयत्न, जिल्ह्यातील प्राथमिक विकास संस्थाना दिले जाणारे अर्थसहाय्य, गटसचिव यंत्रणा तसेच विकास संस्थातील अनिष्ट तफावत कमी करण्यासाठी बँकेने राबविलेल्या योजनांबाबत माहिती घेतली. एकंदरीत या अभ्यास गटाने बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या आयटी विभाग तसेच संचालक मंडळाने बेळगावी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट द्यावी असे आग्रहपुर्वक सागितले.

यावेळी बेळगांवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार  महातनेश दोडगौडार, माजी आमदार  अरविंद पाटील, संचालक राजेंद्र अंकलगी, तज्ज्ञ संचालक  शशिकांत हदीमणी, आयटी विभागाचे सचिन हालपनवर, गंगाधर मुधोळ, प्रमोद जराले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक  व्हीक्टर डान्टस, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रमोद गावडे तसेच बँकेचे सरव्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.