...तर आतापर्यंत शांत असलेला हिंदू रस्त्यावर उतरेल !

सिताराम गावडेंचा इशारा
Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2025 14:51 PM
views 323  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गेल्या ३५ वर्षांपासून गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने हिंदू बांधवांना गोवले जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे. आरोपीच्या बहिणीकडून खोटी विनयभंगाची तक्रार दाखल करून हिंदू समाजातील तरुणांना नाहक फसवण्याचा प्रयत्न झाल्यास आतापर्यंत शांत असलेला हिंदू समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा सकल हिंदू समाज बांधवांच्यावतीने सिताराम गावडे यांनी दिला. त्यांनी आरोपीला तातडीने सावंतवाडीतून हद्दपार करण्याची मागणी केली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 येथील पर्णकुटी विश्रामगृहावर सकल हिंदू समाज बांधवांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला सुनील पेडणेकर, अजित सांगेलकर, महेश पांचाळ, अॅड. राजू कासकर, अमोल साटेलकर, बंटी जामदार, कृतिका कोरगावकर, श्रद्धा धारगळकर आदी उपस्थित होते.

यावेळी सिताराम गावडे म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांपासून सावंतवाडी शहरात गोमांस विक्री करणारा हा आरोपी कोठे मांस विकतो आणि यामागे कोण सूत्रधार आहेत याचा शोध घेणे आवश्यक आहे. बेळगावच्या अधिकृत कत्तलखान्यातून हे मांस येत असल्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. मात्र, हे मांस नेमके कोणत्या हॉटेलमध्ये पुरवले जात होते याचाही शोध घेणे गरजेचे आहे. जर हा प्रकार उघडकीस आणल्यामुळे आमच्या हिंदू बांधवांना खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली, तर त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. गाय ही हिंदूंची माता असून तिची हत्या करून मांसाची वाहतूक व विक्री करणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे, असेही ते म्हणाले.


माजी नगरसेवक सुनील पेडणेकर म्हणाले की, सावंतवाडी हे शांत आणि सुसंस्कृत शहर आहे. येथे सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने नांदत असताना ही विकृती पुढे येऊ देणार नाही. आरोपीला कोण वाचवत आहे आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील. दुकानावर धाड टाकल्यानंतर तिथे चिकन कसे आढळले याचा अर्थ धाडीची माहिती आधीच मिळाली होती, ती कोणी दिली याचा शोध घ्यावा, असेही ते म्हणाले. शहरात या प्रकारामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

आमच्या हिंदू तरुणांना नाहक खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवल्यास हिंदू महिला भगिनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील, असा इशारा हिंदू समाज महिला भगिनी कृतिका कोरगावकर यांनी दिला. एका युवकाच्या मागे ५०० महिला भगिनींची ताकद उभी करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, येत्या सात दिवसांत आरोपीला कठोर शिक्षा न झाल्यास हिंदू महिला भगिनी देखील रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.

पोलीस तपासणी नाकी काय कामाची ?

गेली ३५ वर्षे गोमांस सातत्याने सावंतवाडी शहरात पोलीस तपासणी नाक्यावरून येत असताना पोलिसांना याची माहिती कशी मिळाली नाही, हे आश्चर्यकारक आहे. ही तपासणी नाकी काय कामाची, असा सवाल सिताराम गावडे यांनी उपस्थित केला. ही पोलीस नाकी केवळ हप्ते मिळवण्यासाठी आहेत का, असाही आरोप त्यांनी केला. जे काम पोलिसांनी करायला हवे होते, ते आमच्या हिंदू बांधवांनी केले. जर पोलिसांनी हे काम योग्य वेळी केले असते, तर असे प्रकार वारंवार घडले नसते असेही ते म्हणाले.