
सावर्डे : मानवी जीवनात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असून याची सुरुवात विद्यार्थी दशेतच व्हावी व जीवन आरोग्यदायी सुखी व समृद्ध व्हावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने त्वचेची, केसांची काळजी घेऊन त्याची स्वच्छता राखली तर जीवन स्वच्छ व सुंदर होईल असे मत व्याख्याता अमृता घाग यांनी व्यक्त केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गांधी तीर्थ जळगाव यांचे उपक्रम अंतर्गत सौंदर्य विषयक कार्यशाळा म्हणजेच वैयक्तिक स्वच्छता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्याख्याता अमृता घाग, अनुजा बागवे,नेहा मिस्त्री, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रकुमार वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर व इयत्ता आठवी व नववीच्या 448 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी आपण सुंदर दिसावे असे वाटते हे नैसर्गिक आहे. मात्र त्याचबरोबर आपल्याला शेवटपर्यंत उपयुक्त असणाऱ्या त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे.
आधुनिक काळात विविध सौंदर्यप्रसाधनांची साधने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या सर्वांमध्ये रासायनिक घटकांचा अंतर्भाव असतो. त्याचे दुष्परिणाम काही कालावधीनंतर मानवी जीवनाला समस्येत घेऊन जातात. उदाहरणार्थ केस गळणे, त्वचेची जळजळ होणे हे सर्व टाळायचे असेल तर नैसर्गिक घटकांचा वापर करा. केसांची, त्वचेची व नखांची निगा कशी राखावी याचे प्रात्यक्षिक व्याख्याता अमृता घाग यांनी विद्यार्थिनींना करून दाखविले. विद्यार्थ्यांनीनी या कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून आपल्या समस्यांचे निराकरण करून घेतले.