सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणाचा सुशोभिकरण - विकास आराखडा तयार करा

पालकमंत्र्यांच्या सूचना
Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 17, 2023 19:36 PM
views 90  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी  हे जिल्ह्याच्या मुख्यालयाबरोबरच ही नगरी जिल्ह्याची प्रतिमा सुध्दा आहे. सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना होवून 25 वर्षे पूर्ण झाले आहेत.त्यानिमित्त शासनाने 25 कोटी रुपयांचा निधी प्राधिकरणाच्या सुशोभिकरण व विकासासाठी मंजूर केला आहे. त्यापैकी 8 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित 17कोटी रुपये  शासन स्तरावरुन आणण्यात येतील. या निधीच्या माध्यमातन प्राधिकरणाचा कायापालट करावा. सुशोभिकरण व विकासाकामाबाबत योग्य मार्गदर्शन होण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी, प्राधिकरणाच्या सुशोभिकरण व विकासाबाबतचा  परिपूर्ण नविन आराखडा तातडीने तयार करावा. असे आदेश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाची विशेष  आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, जि.प. मुख्य कार्यकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र  सुकटे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, बांधकाम विभागाचे अधिकारी अजयकुमार सर्वगोड, तहसिलदार श्रीधर पाटील, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, शाखा अभियंता संजय दहिफळे आदी उपस्थित होते. 

प्राधिकरणातील स्वच्छता हा प्राधान्यचा विषय असून याठिकाणी नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे. यासाठी प्राधिकरण व्यवस्थापनाने  प्राधिकरणातील घरे, संस्था यांना कचरा कुंड्या,(डस्टबीन), तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात व  ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्यात यावा, असे आदेशीत करुन पालकमंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले, प्राधिकरण व्यवस्थापनाने घनकचरा निर्मुलनाबाबत तातडीने व्यवस्थापन करावे.यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने काढून घ्याव्यात. प्राधिकरणामध्ये आवश्यक असणाऱ्या सोयी- सुविधा उपलब्ध होण्यासाठी नव्याने आराखडा तयार करावा. प्राधिकरणाचा सर्वे करण्यात यावा, प्राधिकरण सुंदर होईल यासाठी रस्त्यांचे  सुशोभिकरण, दिशा दर्शक फलक, साईन बोर्ड लावण्यात यावेत. त्याच बरोबर निवासी क्षेत्रामध्ये रस्ते, गटारी, करण्यासाठी  प्रक्रीया सुरु करावी. प्राधिकरणाच्या मुख्य प्रवेश व्दाराच्या ठिकाणी बाजारपेठेजवळ जनतेच्या सोयीसाठी स्वच्छतागृह अथवा सुलभ शौचालय उभारावे.

पालकमंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले, प्राधिकरणाच्या दर्शनी भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरणाचे काम सुरु करण्यासाठी निविदा प्रक्रीया राबून सदरचे काम तातडीने सुरु करण्यात यावे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल.प्राधिकरणातील अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना, विद्युत पुरवठा,  स्ट्रीट लाईट याची  सोय करावी. प्राधिकरणात हॉकर्स झोनची निर्मित्ती करुन व्यवसायीकांना आवश्यक सुविधा देण्याबाबत नियोजन करण्यात यावे. मुख्यालयाच्या ठिकाणी  अग्नीशमन यंत्रणा उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावा, यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्याचबरोबर मार्केट उभारण्यासाठी स्थानिक प्रशासन व व्यवसायिकांशी चर्चा करुन मार्केट उभारण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. याबाबत सर्व कामे  करताना प्राधिकरण क्षेत्राच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामपंचायतींशी चर्चा करावी, असे आदेशीत करुन ते पुढे म्हणाले, प्राधिकरण क्षेत्रात सुमारे 600 लाईट पोल आहेत यांचे मार्किंग करण्यात यावे. ज्या परिसरात लाईटची सोय नाही त्याठीकणी   लाईट उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्राधिकरण क्षेत्रात विरंगुळा केंद्र,बगिचा, बसथांबे यांची दुरुस्ती होण्यासाठी प्रयत्न करावेत. असे सांगुन पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी प्राधिकरणानेही उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आदेश त्यानी यावेळी दिले. 

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाची माहिती देवून प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील काळात सुधारणा करण्यातबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधिकरणात पुढील काळात निर्माण करण्यात येणाऱ्या सोयी - सुविधा प्राधिकरणाच्या सुशोभिकरणाबाबतचे संगणकीय सादरीकरण केले. 

 पेंटींग वॉलची पालकमंत्र्याकडून पाहणी

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागातील संरक्षक भिंतीवर जिल्ह्यातील होतकरु चित्रकारांनी सिंधुदुर्गातील खाद्य संस्कृती, परंपरा, दशाअवतार, मस्त्यमारी, संगीत परंपरा,पक्षी, प्राणी, समुद्र किनारे,वाद्ये,यांची सुबक चित्रे रेखाटली आहेत.याची पालकमंत्री  रविंद्र चव्हाण यांनी पहाणी केली. ही रेखाचित्रे साकारणाऱ्या चित्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुशोभिकरणाबाबत माहिती दिली.  यावेळी.जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी आमदार राजन  तेली,  उपस्थित होते.