
दोडामार्ग : तिलारी घाटाच्या माथ्यावर दोन लहान पिल्लांसह एक मोठे अस्वल बागडताना निदर्शनास आले आहे. हे अस्वल खेळत असतानाची छबी काही पर्यटकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केली आहे. या अस्वलाना पाहण्याचा मोह पर्यटकांना आवरला नाही. मात्र पर्यटकांना पाहून अस्वलाने पिल्लासह जंगलात धूम ठोकली. सह्याद्रीच्या पट्ट्यात अस्वलाचे वारंवार दर्शन होत असल्याने येथील त्यांचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील उसप, मांगेली येथे वारंवार अस्वलाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे या परिसरात अस्वलाचे वास्तव्य अधोरेखित झाले. रविवारी काही पर्यटकांना दोन पिल्लासह एका मोठ्या अस्वलाचे दर्शन तिलारी घाटमाथ्यावर झाले. घाटमाथ्यावरील ओसाड रानमाळावर मोठे अस्वल लहान पिल्लांसोबत मनसोक्त खेळत होते. यावेळी काही पर्यटकांना ही अस्वले दिसली. त्यांनी लागलीच मोबाईलमध्ये खेळणाऱ्या अस्वलांना टिकले. यावेळी मनुष्य लगत असल्याची चाहुल अस्वलाला लागली व मोठे अस्वल लहानग्यांना घेऊन दूर गेले. तेथे काही वेळ खेळले व त्यानंतर जंगलात धूम ठोकली. अस्वलांचा हा खेळ पर्यटकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला. खेळणाऱ्या अस्वलांना पाहून पर्यटकांमध्ये कुतुहल निर्माण झाले. अस्वलाचे दर्शन झाल्याने सह्याद्रीच्या पट्ट्यात अस्वलाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.