
सावंतवाडी : 'कुमारवयीन मुलांच्यात निर्माण होणाऱ्या आकर्षण या भावनेचा दुरुपयोग दुसर्याकडून होऊ नये, यासाठी जागृत रहा' असा सल्ला जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ डाॅ.रुपेश पाटकर यांनी वि.स.खांडेकर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सानिका देसाई, शाळेचे मुख्याध्यापक राजाराम पवार, श्री. श्रीशैल परिट, शिक्षिका सारीका शृंगारे, मयुरी इन्सुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डाॅ. पाटकर पुढे म्हणाले की देहविक्रयात येणाऱ्या मुलींपैकी अनेकजणींना त्यांच्या प्रियकराकडून ढकलण्यात येते असे आढळून आले आहे. त्यामुळे आकर्षण भावनेबाबत आपण सावध असले पाहिजे. आकर्षण ही भावना कितीही तीव्र असली तरी ती म्हणजे प्रेम नव्हे समजून घेतले पाहीजे. अशा भावनांबाबत पालकांशी संवाद असायला हवा आणि पालकांनी कुमारवयीनांशी कठोरपणे न वागता समजुतीने वागायला हवे असे प्रतिपादन डॉ. पाटकर यांनी केले.
ते पुढे म्हणाले की देहविक्रय ही संघटित गुन्हेगारी असून ती मुलींच्या असहाय्यतेचा फायदा उठवत चालते. मुलींना जसे आपण जागृत होण्याचे धडे देतो तसेच मुलांनी महिलांकडे वस्तू म्हणून पाहू नये यासाठी मुलांवरदेखील जाणीवपूर्वक संस्कार करण्याची गरज असल्याचे यावेळेस बोलताना डाॅ.पाटकर यांनी नमुद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सानिका देसाई यांनी महिला दिनाचा इतिहास आणि तो पाळण्यामागचे महत्व सांगितले. समाजातील वाईट रुढींना मूठमाती देण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा असे प्रतिपादन सानिका देसाई यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारीका शृंगारे यांनी केले, तर आभार शैला घोगरे यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक राजाराम पवार, श्रीशैल परीट, शैला घोगरे, सारीका शृंगारे, मयुरी इन्सुलकर, सिद्धी देसाई आदि उपस्थितीत होते.