मनुष्यहानी होण्यापुर्वी सावध व्हा..!

मुख्याधिकाऱ्यांना निलेश नार्वेकरांच पत्र | अनर्थ घडल्यास न.प.जबाबदार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2024 06:54 AM
views 405  views

सावंतवाडी : आपल्या एका चुकीमुळे भविष्यात शॉर्ट सर्किटमुळे होणारी सदोष मनुष्यहानी व मालमत्तेची नुकसानी होण्यापुर्वीच तेथील स्टॉल हटवून नागरीकांच्या जीवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करा असं आवाहन निलेश नार्वेकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना केल आहे. त्यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, सावंतवाडी शहरातील बाजारपेठेच्या मध्यभागी नगरपरिषद व महावितरण कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर जयप्रकाश चौक ते गांधी चौक या परिसरात अनेक नुतन स्टॉल महावितरण कंपनीच्या वीज खांबाना लागून व वीज वाहीनांच्या खाली उभारण्यात आलेले आहेत. या प्रकरणी आपण नियमांचे उल्लंघन करुन, सोयीस्करपणे डोळेझाक करणारी भूमिका घेतलेली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह असून सावंतवाडी शहरातील रहिवाशांच्या जीवीताशी खेळ करणारी आहे. या स्टॉलच्या एका बाजूला भाट पेट्रोल पंप व दुसऱ्या बाजूला भांगले पेट्रोल पंप असून पंपास लागून एकीकडे आर.पी.डी. हायस्कूल व ज्युनि. कॉलेज व दुसरीकडे शांतीनिकेतन इंग्लिश स्कूल आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी ये-जा करीत असतात.

अशा परिस्थितीत वीज वाहीनांच्या खालील उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या फॅब्रीकेशन स्टॉलवर दुर्दैवाने वीज वाहीन्या तुटून पडल्यास किंवा पावसाळ्यात शॉर्ट सर्किट सारख्या कारणांमुळे आगीसारखे भयावह प्रकार घडल्यास होणाऱ्या दुर्घटनेची भीषणता स्टॉलच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या पेट्रोल पंपामुळे अधिकच प्रक्षोभक होऊन कशानेही भरुन येणार नाही अशी अपरिमित जीवीत व वित्तहानी होणारी आहे. या सर्व प्रकारात सर्वसामान्य जनतेचेच अतोनात नुकसान होणारे असून त्यास सर्वस्वी आपली अक्षम्य बेफीकर वृत्ती व निष्काळजीपणा कारणीभूत ठरणारा आहे.त्यामुळे  सार्वजनिक हितासाठी दिलेल्या निवेदनाचा गंभीर विचार करुन, सुरक्षिततेचीबाब म्हणून वीज खांबाना लागून व वीज वाहीन्यांच्या खाली उभारण्यात आलेले सर्व स्टॉल काढून टाकून त्यांना सुरक्षित स्थळी स्टॉल उभारुन देवून सर्वसामान्य रहीवाशांच्या जीवीताचे संरक्षण करावे. तात्काळ कोणतीही कार्यवाही न झाल्यास, आपल्या चुकीमुळे कोणत्याही प्रकारे जीवीत हानी होऊन अनर्थ घडल्यास सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या नात्याने आपण व आपल्या बांधकाम विभागातील सर्व अधिकारी या दुर्घटनेस जबाबदार राहणार असून प्रसंगी न्याय्य हक्कासाठी आपल्या विरुद्ध सक्षम न्यायालयात याचिका दाखल करणे भाग पडणारे आहे याची नोंद घ्यावी असा इशारा श्री. नार्वेकर यांनी दिला आहे.