लढाई अस्तित्वाची | गावात हवा कुणाची ?

ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच चुरस | मातब्बर मंडळीच्या प्रतिष्ठा पणाला
Edited by: विनायक गांवस
Published on: November 20, 2022 16:32 PM
views 414  views

सावंतवाडी : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे. युतीबाबत अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉग्रेस, राष्ट्रवादीसह मनसेनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तालुक्यात ५२ ग्रामपंचायत निवडणूका होवू घातल्या असून येत्या १८ डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. यामध्ये बांदा, माडखोल, माजगाव, कारीवडे, भालावल, विलवडे, तिरवडे, चराठे,  कलंबिस्त, मडूरा, नेमळे, नेतर्डे, निरवडे, सातार्डा आदिं ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे. या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मातब्बर मंडळीच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. 


या ग्रामपंचायतींची होतायत निवडणूका


या निवडणुकीत आजगाव, आंबेगाव, असनिये, बांदा, भालावल, भोमवाडी, चराठे, डेगवे, देवसू दाणोली, धाकोरे, गेळे, गुळदूवे, कलंबिस्त, कारीवडे, कास, कवठणी, केसरी फणसवडे, किनळे, कोनशी दाभीळ, कुडतरकरटेंब सावरवाड, कुणकेरी, माडखोल, मडुरा, माजगाव, नाणोस, नेमळे, नेतर्डे, न्हावेली, निगुडे, निरवडे, ओटवणे, ओवळीये, पाडलोस, पडवे-माजगाव, पारपोली, रोणापाल, सांगेली, सरमळे, सातार्डा, साटेली तर्फ सातार्डा, सातोसे, सातुळी बावळाट, शेर्ले, शिरशिंगे, सोनुर्ली, तळवणे, तांबुळी, तिरोडा, वाफोली, वेर्ले, वेत्ये, विलवडे या ५२ ग्रामपंचायत निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत नामनिर्देशन पत्र २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ ते ३ वाजेपर्यंत दाखल करण्यात येणार आहेत. या नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या निवडणुकीच मतदान १८ डिसेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तर मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.


अस्तित्वाची लढाई


 या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी करून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तसेच भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट युती करून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी चाचपणी सुरू असून ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्ष रिंगणात नसले तरी पॅनल उभे करून राजकीय पक्ष लढत देणार आहेत. विद्यमान आमदार, शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात होणाऱ्या ह्या निवडणूका बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोर मोठ आव्हान असणार आहे. तर भाजपला सुद्धा ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याच कडव आव्हान आहे. त्यात कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून महाविकास आघाडी करत बलाढ्य विरोधकांना रोखण्याच आव्हान असून खरेदी-विक्री संघात युतीच्या ताकदीसमोर भूईसपाट झालेल्या ह्या तिन्ही पक्षांचं तालुक्यातील भवितव्य ग्रामपंचायतीत ठरणार आहे. युती न झाल्यास भाजप विरुद्ध दीपक केसरकर अर्थात बाळासाहेबांची शिवसेना असा थेट संघर्ष पहायला मिळेल. दरम्यान, खरेदी-विक्री संघातील मैत्री कायम राहील असा दावा नेत्यांनी या आधी केल्यानं भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे.