पटवर्धन चौकातील बॅरिकेट्स देतायत अपघाताला निमंत्रण : प्रमोद मसुरकर

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 07, 2024 06:21 AM
views 225  views

कणकवली : कणकवली शहरातील पटवर्धन चौकात वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेट्स हे अपघाताला निमंत्रण देत असून याकडे कणकवली पोलीस प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी केला आहे.


याबाबत प्रमोदशेठ मसुरकर यांनी म्हटले आहे की पटवर्धन चौक हा कायम रहदारी आणि वाहतुकीने गजबजलेला असतो.  मात्र शहरात कोठेही नसणारे बॅरिकेट्स  केवळ पटवर्धन चौकात लावण्यात आले आहेत. हे बॅरिकेट्स अधिकृत असतील तर जेव्हा एखादा धार्मिक, सामाजिक, अथवा राजकीय कार्यक्रम पटवर्धन चौकात घेतला जातो तेव्हा ते का हटवले जातात ? आणि जर ते बॅरिकेट्स अनधिकृत असतील तर वाहतूक पोलिसांसमक्ष कसे लावलेले असतात ? असा सवालही मसुरकर यांनी केला आहे.

बॅरिकेट्स मुळे कंटेनर सारखे एखादे अवजड वाहन आले तर पादचारी अथवा वाहनचालकांचा अपघातसुद्धा याच बॅरिकेट्स मुळे होण्याचा धोका संभवतो. याची तात्काळ दखल घेत जर हे अनधिकृत बॅरिकेट्स असतील तर तात्काळ हटवावेत अन्यथा शिवसेना शहरप्रमुख म्हणून आंदोलन करण्याचा इशारा प्रमोदशेठ मसुरकर यांनी दिला आहे.