बापूसाहेब महाराजांच्या कार्याची इतिहासाने योग्य दखल घेतली नाही

इतिहास अभ्यासक शिवप्रसाद देसाई यांनी व्यक्त केली खंत
Edited by: विनायक गांवस
Published on: October 29, 2024 14:29 PM
views 197  views

सावंतवाडी : पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांनी तत्कालीन सावंतवाडी संस्थानात लोकशाही राजवटीची बीजे पेरली. ते केवळ राजा नव्हते तर त्यांच्यात लोकाभिमुख कारभार करणारे एक अख्खे राज्य सामावले होते. मात्र इतिहासाने त्यांच्या या महान कार्याची योग्य दखल घेतली नाही, अशी खंत इतिहास अभ्यासक तथा पत्रकार शिवप्रसाद देसाई यांनी व्याख्यानात व्यक्त केली.      

सावंतवाडी संस्थानचे राजे पुण्यश्‍लोक बापूसाहेब महाराज यांच्या पुर्ण क्षमतेने राज्याची सुत्रे हाती घेत झालेल्या राज्याभिषेकाचा शताब्दी महोत्सव उद्या मंगळवार पासून सुरु होत आहे. यानिमित्त सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई या संस्थेची सावंतवाडी व कुडाळ समितीच्यावतीने राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सहकार्याने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.यावेळी सावंतवाडी समितीप्रमुख व्ही. बी. नाईक, कुडाळ समितीप्रमुख आर. एल. परब, मुख्याध्यापक जगदीश धोंडस, सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर, भरत गावडे, सतीश बागवे, सु. वि. गवस, सी. एल. नाईक आदी उपस्थित होते.

श्री. देसाई यांनी बापूसाहेब महाराजांच्या राज्य कारभाराचे अनेक पैलु यावेळी मांडले. ते पुढे म्हणाले, "छोटे संस्थान, मर्यादित महसूल, ब्रिटिशांची करडी नजर अशा सगळ्या प्रतिकूल गोष्टी असूनही जनतेच्या भल्यासाठी कोणतीही कसर राहू नये यासाठी बापूसाहेब महाराज यांनी आपले अख्खे आयुष्य अर्पण केले. स्वत: फिरून जनतेमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर असे. स्वतंत्र कृषी खाते निर्माण करून शेतीसाठी पुरविलेल्या सुविधा, आरोग्य, स्त्रीशिक्षण, व्यसनमुक्ती यासाठी केलेले काम अद्वितीय आहे. ते तेजस्वी आणि प्रत्येकाला भुरळ घालणारे व्यक्तिमत्व होते. राजकारणापेक्षा समाजकारण करण्यावर नेहमी भर देणारे, राजेशाहीपेक्षा लोकशाही मूल्यांचा सातत्याने पाठपुरावा करणारे,विवेक, संयम, सुसंस्कृतता या मूल्यांवर विश्वास असणारे ते राजे होते. त्यांनी लहानपणापासूनच शेवटच्या क्षणापर्यंत लोकांसाठी केलेला संघर्ष हा प्रेरणादायी आहे."


ते म्हणाले, "तत्कालीन स्थितीत असलेल्या लोकाभिमुख कारभार असलेल्या राजांच्या यादीत त्यांचे नाव खरे तर वरच्या क्रमांकाला आहे. मात्र इतिहासाने त्याची योग्य दखल घेतली नाही. त्यांनी आपल्या अवघ्या तेरा वर्षांच्या कार्यकाळात लोकशाहीची बीजे येथे पेरली. त्याची फळे आजही आपण चाखत आहोत." या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत गावडे तर सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले.