
बांदा : अकराव्या दिवशी बाप्पाच्या विसर्जनावेळी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मडुरा माऊली मंदिराजवळील पुलावर पाण्याचे प्रमाण वाढले. गावातील गणरायाची मूर्ती माऊली मंदिरात नेताना व विसर्जनास आणताना भक्तांना त्रास झाला. पुलाची उंची वाढविण्यासाठी वारंवार मागणी करुनही प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून ग्रामस्थांची केवळ दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा उपोषणास बसणार असल्याचा इशारा भाजपा सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे यांनी प्रशासनास दिला.
अकरा दिवसांच्या बाप्पांना मडुऱ्यात भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दिवसभर पाऊस असल्यामुळे पाण्याचे प्रमाणही बऱ्यापैकी वाढले होते. गावातील सर्व गणेशमूर्त्या माऊली मंदिरात आणताना पावसाच्या पाण्याचा अडसर निर्माण झाला. मंदिरात नेलेल्या मूर्ती विसर्जनासाठी आणताना थांबावे लागले तर काही मुर्त्या मंदिरात नेता आल्या नाहीत. गोव्यात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने वाहनांचीही काहीवेळ रांग लागली होती. पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि पुलाची उंची कमी असल्यामुळे गणेश मूर्ती विसर्जन होईपर्यंत सर्वांना थांबावे लागले. उपस्थित भाविकांनी सर्व रोष प्रशासनावर व्यक्त केला.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आम्हाला रात्री दोन वाजेपर्यंत गणेश मूर्ती विसर्जन कराव्या लागल्या. वारंवार पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात मागणी व पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता कोणतेही आश्वासन वगैरे नको तर थेट प्रत्यक्ष कार्यवाही होत नसेपर्यंत आपण शांत बसणार नाही. परिणामी सर्व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बाळू गावडे यांनी देत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.