
सावंतवाडी : 'आता बदल हवो तर आमदार नवो ' आशयाचा बॅनर लावत मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासात्मक घोषणांच्या विरोधात सावंतवाडी शहरासह मतदारसंघात काही ठिकाणी बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरच्या विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धडक देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. दीपक केसरकर पक्षाचे प्रमुख नेते असून त्यांची यापुढे अशा रितीने बदनामी कोणाकडून होत असेल तर शिवसेना पक्ष कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
याबाबतचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना सादर केले. यावेळी महिला आघाडी प्रमुख ॲड. नीता कवीटकर, उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी,तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, तानाजी वाडकर, देव्या सूर्याजी, अर्चित पोकळे, प्रतिक बांदेकर, माजी नगरसेविका किर्ती बोंद्रे , महिला शहर प्रमुख भारती मोरे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर, राजन रेडकर, विनायक सावंत, संदेश सोनुर्लेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बॅनरच्या माध्यमातून मंत्री दीपक केसरकर यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे.ही गोष्ट सुसंस्कृत सावंतवाडीकर नागरिक कधीही सहन करणार नाही. बॅनर वरील भाषा पाहता ते कोणी लावले हे स्पष्टपणे दिसणारे आहे. त्यामुळे अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी. आमचा नेता शांततेचा पुरस्कार करणारा आहे मात्र म्हणून आम्ही शांतच बसू असा कोणी गैरसमज करून घेऊ नये वेळ पडल्यास आम्ही देखील आक्रमक होऊ शकतो व तसे होण्यास आम्हाला भाग पाडू नये असा इशारा यावेळी गजानन नाटेकर यांनी दिला. दरम्यान, त्या त्या भागातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून सदरचे बॅनर कोणी लावले याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर शिवसेना पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.