कासार्डे क्रिकेट स्पर्धेत बंडवाडी संघ विजेता...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 17, 2023 22:15 PM
views 217  views

कणकवली : तालुक्यातील कासार्डे येथील माजी सरपंच संतोष पारकर मित्र मंडळाच्या वतीने पावसाळी  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता.१६) एकाच दिवशी गावातील प्रत्येक वाडीतील एका संघाने या स्पर्धेत सहभाग घेतल्या. या स्पर्धेचे विजेतेपद बंडवाडी संघाने पटकावले असून उपविजेता संघ तर्फेवाडी ठरला आहे.

आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस हा गटारी अमावास्येने साजरा केला जातो. त्यामुळे गटारी अमावास्याचे पूर्वसंध्येला अर्थात रविवारी बहुतांशी ठिकाणी तरुण विविध प्रकारच्या रंगीले पार्ट्या करीत असतात. युवा पिढी कोणत्याही नशेच्या पार्टीच्या मागे न लागता. त्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा. हे उद्दिष्ट ठेवून कासार्डे येथील संतोष पारकर मित्रमंडळाने रविवारी गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. भोगलेवाडी रानमाळवर भव्य अशा मैदानात डीजेच्या तालावर ही स्पर्धा झाली.

प्रत्येकी चार षटकांचे सामने झाले. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत गावातील विविध वाड्यातील तरुणांच्या संघाने यात सहभाग घेतला होता. अंतिम सामना रंगतदार झाला. या स्पर्धेमध्ये गणेश कोलते, ओंकार गाडे या क्रिकेटपटूंनी उत्तम अशी फलंदाजी करून भरघोस अशी बक्षिसे आपल्या नावावर केली. माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर, माजी सरपंच संतोष पारकर, विद्या नकाशे आदीसह गावातील मान्यवरांनी या स्पर्धेत सहभागी घेतला होते. स्पर्धा बघण्यासाठी कासार्डे गावातील अनेक तरुण दिवसभर मैदानावरच होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने कासार्डे गावातील क्रिकेट प्रेमी तरुण मंडळी यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.