
बांदा : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये तसेच नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी यासाठी प्रशासन सज्ज होत असतानाच बांदा येथील ग्रामस्थांनी स्थानिक पूरप्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे. नुकतीच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला होता. या पार्श्वभूमीवर बांदा ग्रामस्थांनी जि.प. अध्यक्ष तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
बांदा शहर हे बुडीत व पूरप्रवण क्षेत्र म्हणून नोंदले गेले असून दरवर्षी पूरस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे आपत्तीच्या काळात तातडीने मदत पोहोचण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आपत्कालीन परिस्थितीसाठी शासनाकडून देण्यात आलेली फायबर बोट वजनाने हलकी असल्याने पूराच्या प्रचंड प्रवाहात तिचा प्रभावी वापर होत नाही. त्यामुळे मजबूत लाकडी बोट उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच विद्यमान फायबर बोटीला आउटबोर्ड इंजिन बसवून देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
या मागण्यांची तात्काळ दखल घेत जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देत पावसाळ्यापूर्वी लाकडी बोटीसह आपत्कालीन साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, पाटेश्वर युवक मंडळाचे राज हरमलकर, साई मठाचे राकेश केसरकर, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते निलेश नाटेकर, दिलीप बांदेकर, शुभम कवठणकर आदी उपस्थित होते.










