
बांदा : घारपी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९००रोजी सातारा शहरातील शाळेत प्रवेश घेतला होता. त्या स्मृतिदिनानिमित्त शासनाच्या वतीने हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिवशी घारपी शाळेत विद्यार्थी बाबाजी विजय कविटकर याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील यांचा विद्यार्थ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आणि शिक्षणातील योगदानाचा आढावा विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.










