
बांदा : जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली सिंधुदुर्गचा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने लोकमान्य टिळक जयंती निमित्त कला अकादमी मुंबई आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात तृतीय येण्याचा बहुमान पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल तिनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर सफर सह्याद्री शिवोत्सव मुंबई, आयोजित वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेतही नील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा विजेता ठरला.
तसेच काही महिन्यापूर्वीच नीलला त्याच्या समस्त यशाचा आढावा लक्षात घेऊन सिंधुदुर्गातील प्रतिष्ठित अशा सह्याद्री प्रतिष्ठानचा सह्याद्री गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
नीलने आतापर्यंत चित्रकला,हस्ताक्षर,वेशभूषा, गीत गायन, कथाकथन, अभिनय,वक्तृत्व, निबंध,मॉडलिंग यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पाचशेच्या वर बक्षिसे पटकावली आहेत. हस्ताक्षरासाठी नीलला त्याचे मामा डॉक्टर उमेश सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आणि अन्य स्पर्धांसाठी आई गौरी बांदेकर आणि वडील नितीन बांदेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.