बांदा - डिंगणे रस्त्यावर गवा रेड्यांचा संचार !

काजू बागायतदार धास्तावले
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 17, 2023 17:50 PM
views 193  views

बांदा : बांदा - डिंगणे रस्त्यावरच बांबरवाडी येथे मंगळवारी सकाळी तब्बल पंधराहून अधिक गव्या रेड्यांचा कळप ठाण मांडून बसल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. तब्बल अर्ध्या तासानंतर गव्यांच्या कळपाने लगतच्या काजू बागायतीत आसरा घेतला. दिवसाढवळ्या गव्यांनी रस्ता अडविणे हे नित्याचेच झाले असून गव्यांच्या वावरामुळे काजू बागायतदार धास्तावले आहेत.

यापूर्वी देखील बांदा-डिंगणे रस्ता गव्यांच्या कळपाने अनेकवेळा अडविला होता. डिंगणेचे माजी सरपंच जयेश सावंत हे आपल्या गावातील सहकाऱ्यांसोबत या रस्त्यावरून येत असताना बांबरवाडी येथे १५ हून अधिक गव्यांचा कळप रस्त्यावरच ठाण मांडून असल्याचे दिसले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत आपली गाडी सुरक्षित ठिकाणी उभी केली. तसेच रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या वाहनधारकांना देखील खबरदारीच्या सूचना दिल्यात. तब्बल अर्धा तास गवे रस्त्यावरच ठाण मांडून होते.

त्यानंतर त्यांनी रस्त्यालगतच्या काजू बागायतीत आसरा घेतला. त्याठिकाणी देखील बराच वेळ त्यांचा मुक्त संचार सुरू होता. दिवसाढवळ्या गव्यांचा मुक्त वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून दुचाकी चालकाला एकट्याने प्रवास करणे जीवावर बेतणारे आहे. काजू हंगाम सुरू होणार असल्याने गव्यांच्या वावरामुळे शेतकरी देखील भयभीत झाला आहे. या गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.