मानाचा कुणबी चषक बलदेवाडी संघाने पटकावला

मंडणगड कुणबी क्रीडा असोसिएशन स्पर्धा
Edited by: मनोज पवार
Published on: March 06, 2025 12:57 PM
views 218  views

मंडणगड : मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीने नारंगी मैदान विरार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला रौप्य महोत्सवी मानाचा कुणबी चषक हा अप्रतिम सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत बलदेवाडी संघाने पटकावला. तर साखरी संघ उपविजेता संघ ठरला. तृतीय आंबवली, चतुर्थ पन्हळी बुद्रुक संघ ठरला.

               कुणबी क्रीडा असोसिएशनचेवतीने प्रतिवर्षाप्रमाणे कुणबी चषक २०२५ चे भव्यदिव्य आयोजन नांरगीच्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये असोसिएशनच्या ४८ संघाना प्रवेश देण्यात आला होता. शुभारंभी मनस्वी बोर्लेने गाण्यातून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कुणबी चषकाचे गौरवगाणेने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी समाजसेवक संदीप राजपुरे यांच्या वतीने स्पर्धेतील सर्व संघाना देण्यात आलेल्या टीशर्टचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एकूण दोन गटांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत रोमहर्षक व अटतटीच्या लढती पहायला मिळाल्या. चौकार षटकारांची आतिषबाजी पहायला मिळाली. १ आणि २ मार्च रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील सहभागी संघानी फलदांजी, गोलदांजी, क्षेत्ररक्षण यांचे संघटित कौशल्य दाखविताना सामाजिक बांधीलकीने शिस्तबध्दपणे ही स्पर्धा संपन्न केली. स्पर्धेच्या पारितोषीक वितरणाला कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष व प्रथम क्रमांक प्रायोजक मनोज घागरुम, समाजनेते भाई पोस्टुरे, सुनील शिगवण, रघुनाथ पोस्टुरे, मारुती पालणकर, मुरलीधर बैकर, विजय ऐनेकर, क्रीडा प्रमुख अनंत रटाटे, विनोद गोठल, अध्यक्ष हेमंत शिगवण, कार्याध्यक्ष दत्ताराम गोठल, सचिव हेमंत दुसार, खजिनदार सचिन दुसार, नामदेव पालणकर, वासुदेव बांद्रे व सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यातील सामनावीरास सन्मानचिन्ह व टीशर्ट देवून गौरवण्यात आले. अंतीम विजेत्यास पस्तीस हजार, उपविजेत्यास वीस हजार, तृतीय दहा हजार, चतुर्थ सात हजार व सर्वांना आर्कषक चषक देवून गौरविण्यात आले. तसेच सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजास पंधरा हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. उपस्थिताना रौप्य महोत्सवी वर्षाची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. सामन्यांचे समालोचन सुप्रसिद्ध समालोचक प्रशांत अदावडे, तुकाराम मंगेला, धनंजय पाटील यांनी केले. पंच म्हणून सुरेश दळवी, उपेंद्र पंडित, हेमंत ठाकूर, दिनेश म्हात्रे, जितू सोनार यांनी काम पाहिले. लाईव्ह प्रेक्षपण युनिक लाईव्ह युट्यूब चॅनेलवर करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट खेळाडू मानकरी 

सर्वोत्कृष्ट गोलंदाज- राज चव्हाण (साखरी), सर्वोत्कृष्ट फलंदाज- समीर सावंत (बलदेवाडी), मालिकावीर- राजदीप भुवड (बलदेवाडी), सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - अथर्व लोंढे (पालेगाव), तसेच आंबडवे, चिंचघर संघाला विशेष सन्मानित करण्यात आले.