''बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'' सावंतवाडीत !

सरकार हॉस्पिटलवरील ताण कमी होणार ; दोन ठिकाणी 'क्लिनिक' सुरू होणार
Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2023 16:52 PM
views 233  views

सावंतवाडी : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' ही योजना शिंदे-फडणवीस सरकारने राज्यभरात सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 700 दवाखाने सुरू केले जाणार असून सावंतवाडी शहरात त्यातील दोन दवाखाने सुरू करण्याच काम युद्धपातळीवर सुरू आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची होत असलेली प्रचंड गर्दी लक्षात घेता ताप, सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय चाचणी करण्यासाठी हे दवाखाने उपयुक्त ठरणार आहेत. 


दैनंदिन रुग्णांमुळे सरकारी हॉस्पिटलवरील ताण वाढत आहे. ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभागा अशा तात्काळ उपचार गरजेचे असलेल्या रुग्णांच्या उपचारावर होतो. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती व जवळच्या ठिकाणी मोफत आरोग्य सुविधा या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात सकाळपासून रात्रीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारी रूग्णालयावरील ताण कमी होऊन रूग्णांना देखील 'आपला दवाखाना' सोयीस्कर ठरेल. 


 सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरी भागात आपला दवाखाना सुरू करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यातील सावंतवाडी शहरात २ ठिकाणी हे दवाखाने सुरू होणार आहेत. सर्दी, तापासह डायबीटिस, बीपी आदी आजारांची तपासणी व त्यावर उपचार केले जाणार आहेत. सालईवाडा येथील मुख्याधिकारी निवासस्थानच्या जागेत तर जिमखाना मैदान येथील लाखेवस्ती येथे हे दवाखाने सेवा देणार आहेत. तर सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून सेवा देणारा दवाखाना सुरूच राहणार आहे. या ठिकाणी डॉ. उमेश मसुरकर यांची ओपीडी चालते. श्री. टोपले व मदतनीस असे तीन जण या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यात आता या दोन दवाखान्यांच्या वाढीमुळे शहरात तीन दवाखाने होणार आहेत. याचा फायदा शहरातील लोकांना होणार आहे. 


नव्या ठिकाणी १ डॉक्टर, नर्स आणि कपांउडर असे ३ कर्मचारी सेवा देणार आहेत. या डॉक्टरांची नियुक्ती लवकरच होणार असून दोन्ही दवाखान्यांची डागडुजी पूर्ण झाल्यानंतर हे दवाखाने रूग्णसेवेस कार्यान्वित करण्यात येतील. ओपीडी बेसवर या ठिकाणी सेवा दिली जाईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. त्यामुळे या नव्या दवाखान्यांचा फायदा लोकांना होणार असून लवकरच या दोन्ही दवाखान्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.


हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही महाराष्ट्र शासनाची योजना चांगली आहे. सद्यस्थितीत ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात राबविण्यात येणार आहे तेही दोन दवाखाने. त्यातच सरकारी दवाखान्यात जिल्हात डॉक्टरांची कमतरता असताना अजून दोन दवाखाने होत आहेत. शहरात जिथे याची आवश्यकताही नाही.जिथे रुग्णालयाची कमतरता आहे अशा ठिकाणी हे दवाखाने व्हायला हवे, ते शहरात होत आहेत. जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था सुधारत नसुन आपली राजकीय उंची वाढवण्यासाठी व स्वतःची पाठ स्वतः ठोपटून घेण्यासाठी हे केलं जात आहे. मुख्यमंत्री सावंतवाडी येत आहेत त्यामुळे त्यांना दाखवण्यासाठी हे दवाखाने होत नाही आहेत ना ? जर अशीच शासकीय पैसा आणि मालमत्तेची उधळण होत असेल तर जनता कधीच माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया युवासेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हा अधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांनी दिली आहे.