...जर बाळासाहेब नसते तर मी आमदार झालो नसतो !

वैभव नाईक झाले भावूक
Edited by: भरत केसरकर
Published on: January 23, 2024 05:53 AM
views 1174  views

कुडाळ : ....जर बाळासाहेब नसते तर मी आमदार झालो नसतो, २००९ च्या पराभवानंतर कसा झालो आमदार ?असे अनेक अनुभव कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईकांनी केले कथन केले आहेत.आ ज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. यानिमित्ताने वैभव नाईक यांनी आमदारकीचा सांगितलेला तो किस्सा पहा....

     हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सामान्यातील सामान्य कार्यकर्ते घडविले. संपुर्ण देशात हा एकमेव नेता असेल ज्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम केले. बाळासाहेब ठाकरे नसते तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता कधी आमदार होऊच शकला नसता. आम्हा शिवसैनिकांसाठी बाळासाहेब हे आमचे दैवत आहेत. सर्वप्रथम त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

      शिवसेनेत प्रवेश करण्याअगोदर बाळासाहेबांबद्दल मी अनेक दंतकथा ऐकल्या होत्या परंतु प्रत्यक्षात बाळासाहेब व माझी कधी भेट झाली नव्हती. मात्र २००९ विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मला मातोश्रीवरून श्री.म्हात्रे यांचा कॉल आला. ते म्हणाले, "बाळासाहेबांनी तुम्हाला भेटायला बोलावलय...!" त्यांच्या त्या एका वाक्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता परंतु त्याच वेळी साक्षात शिवसेनाप्रमुखांना जाऊन भेटायचे म्हणून ह्रुदयात धडधड वाढली होती. खरतर विधानसभा निवडणुकीतील पराभवाने मी पुरता खचून गेलो होतो. त्यामुळे मी मुंबईला जाण्याचे टाळत होतो. शिवाय पराभवाची जखम ताजी असताना बाळासाहेबांची भेट कशी घ्यायची हा प्रश्न देखील सतत मनाकडे येत होता. मातोश्री वरून पुन्हा एकदा कॉल आला. आणि यावेळी ताबडतोब मातोश्रीवर येण्यासंदर्भात शिवसेनाप्रमुखांचे थेट आदेश होते. मी दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर दाखल झालो. त्यावेळी माझ्यासोबत राजन नाईक व अभय शिरसाट देखील होते. मी मातोश्रीवर पोहोचलो आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाकलो. मी आशीर्वाद घेताच बाळासाहेबांनी उठून मला मिठीत घेतले आणि माझे मातोश्रीवर स्वागत केले. बाळासाहेबांनी मिठीत घेण ही गोष्टच माझ्यासाठी स्वप्नवत व अनपेक्षित अशीच होती. मला मिठीत कवटाळून शिवसेनाप्रमुख म्हणाले की, "तुला  ताकद देण्यास आम्हीच कुठेतरी कमी पडलो. मात्र तुला एका मातब्बर उमेदवाराविरोधात मिळालेली विक्रमी मते ही खऱ्या अर्थाने तुझ्यासाठी विजयासमानच आहेत. निदान माझ्यासाठी तरी तू ही लढाई जिंकली आहेस. आज माझ्याजवळ तुला देण्यासारखे काही नाही परंतु मी तुला आशीर्वाद देतो की एक ना एक दिवस  तू नक्कीच विजयश्री खेचुन आणशील आणि सन्मानाने विधानसभेत आमदार बनुन जाशील. या पराभवाने तू अजिबात खचून जाऊ नकोस कारण उद्याचा विजय हा तुझाच आहे." शिवसेनाप्रमुखांच्या या एका वाक्याने माझ्या मनात पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यावेळी साहेबांनी उद्धवजींना बोलावून घेतले व त्यांना म्हणाले, "हा मतांच्या बेरजेत हरला असला तरी लढाई जिंकला आहे. पुढच्या वेळी हा नक्कीच आमदार होईल. बाळासाहेबांनी म्हटलेले ते दैवी शब्द अखेर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खरे ठरले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्वप्नातही वाटले नव्हते की मी कधीतरी आमदार बनेन. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने ते शक्य झाले होते. बाळासाहेबांनी माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांना अक्षरशः शून्यातून घडवले. कोकणातील लोंकांवर व कोकणच्या भूमीवर त्यांनी भरभरून प्रेम केले. त्यांचा आशीर्वाद व सहवास मला लाभला यातच माझे आयुष्य सार्थकी लागले. 


वैभव विजय नाईक, आमदार, कुडाळ - मालवण मतदारसंघ