चोरी प्रकरणीतील संशयिताला जामीन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 21, 2023 19:50 PM
views 86  views

वैभववाडी : शहरातील अकिंत मेडिकलमधील चोरी प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपी राजाराम विष्णू हवालदार (वय-३८)मुळ रा.बेळगाव याला  आज (ता.२१) पोलीसांनी कणकवली न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर झाला. पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले असता श्री.हवालदार याने  सॅनिटायझर प्राशन केले. त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर आज  त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

शहरातील संभाजी चौकासमोर असलेले अकिंत मेडिकल अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (ता.१८) फोडले. दुकानातील रोख रक्कम आणि तीन संगणक स्क्रीन चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणाचा तपास पोलीसांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातुन सुरू केला होता. संशयित सीसीटिव्हीत कैद झाला होता. त्यासंदर्भातील  एक व्हीडोओ आणि फोटो  पोलीसांनी व्हायरल केले होते. त्यानुसार शहरात एका ठिकाणी तशा वर्णनाची व्यक्ती असल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी मंगळवारी सायकांळी मुळ बेळगाव सध्या रा.वैभववाडी येथील राजाराम हवालदार याला ताब्यात घेतले. ज्यावेळी ताब्यात घेतले त्यावेळी दारूच्या नशेत होता. त्यामुळे पोलीसांना त्याच्याकडुन माहीती घेणे शक्य झाले नाही. त्याच्याकडुन चोरलेली रक्कम आणि संगणक स्क्रीन आढळुन आली. त्याला बुधवारी चौकशीसाठी पोलीस स्थानकात आणले होते. दरम्यान तेथे संशयिताने सॅनिटायझर प्राशन केले. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली, त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला कणकवली न्यायालयात सायंकाळी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.