'आंबोलीचा बाहुबली धबधबा' ! | मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन

Edited by: विनायक गावस
Published on: August 12, 2023 20:47 PM
views 473  views

सावंतवाडी : आंबोली मुख्य धबधब्या शेजारील बाहुबली धबधब्याचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर  यांच्याहस्ते करण्यात आले. आंबोली पर्यटन वाढावे यासाठी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर  सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने हा धबधबा आता सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. आंबोली वर्षा महोत्सवाच औचित्य साधून हा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

मुख्य धबधब्यासह इतर असे पाच ठिकाणी धबधबे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. याचा पर्यटकांसोबतच स्थानिक व्यापाऱ्यांना फायदा होणार असून  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. ही सुरुवात असून येत्या सहा महिन्यांत चित्र बदलेल दिसून येईल. आंबोलीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने गतीने प्रयत्न सुरू केले आहेत असं मत मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान 'आंबोली वर्षा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. याच औचित्य साधून  मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता नाईट सफारी, हिरण्यकेशी ट्रेकिंग, जलक्रीडा, रॅपेलिंग अशा विविध प्रकारांचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे. ऍडव्हेंचर ट्रेकसह बारमाही पर्यटनासाठी मंत्री केसरकर यांचे विशेष प्रयत्न असून आर्किटेक्ट अमित कामत यांच्यावर पर्यटन विकासाची जबाबदारी सोपवल्याच केसरकर आपल्या भाषणात म्हणाले. त्यामुळे येत्या काळात आंबोलीतील वर्षा पर्यटनाला अधिक उंचीवर नेण्याच काम होणार असून  बाहुबली धबधबा, वर्षा महोत्सव ही त्याची पहिली पायरी आहे.