कचऱ्यामुळे पसरली दुर्गंधी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 30, 2024 11:48 AM
views 241  views

देवगड : देवगड-जामसंडे शहराच्या कचराप्रश्नाची समस्या अद्यापही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नगरपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच तात्पुरत्या स्वरूपात शहरातील साठवलेल्या कचऱ्याची पावसामुळे दुर्गंधी पसरली आहे. अद्यापही कचरा तेथेच असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पर्यायाने कार्यालयात येणारे नागरिक दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत.कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही हा त्रास सहन करावा लागत असल्याने यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथील देवगड जामसंडे शहराचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी काही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. कचरा समस्या ही शहरातील नागरिकांची मोठी डोकेदुखी बनली आहे. पावसापूर्वी उन्हाळ्यात येथील नगरपंचायत कार्यालयाशेजारी तात्पुरत्या स्वरूपात कचरा साठवून ठेवला होता.त्यामुळे मोकाट गुरे आणि भटकी कुत्री यांचा वावर वाढला होता.यातून परिसरात दुर्गंधीही पसरल्याने याकडे स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतचे लक्ष वेधले होते.साठवलेला कचरा तातडीने उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांकडून त्यावेळी केली होती.तसेच नगरपंचायत कार्यालयाशेजारी उघड्यावर कचरा असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही ही बाब धोकादायक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. यातूनच होत असलेल्या दुरावस्थेमधून दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील असे ग्रामस्थांना त्यावेळी आश्वासित करण्यात आले होते.त्यानुसार तातडीने काही कचरा उचलण्यातही आला. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने ही काहीशी दिलासादायक बाब मानली जात होती.मात्र उर्वरित कचरा तसाच कार्यालयाबाहेर असल्याचे सद्यस्थितीत

दिसून येत आहे. सध्या पावसामुळे कचरा ओला होऊन त्यातुन दुर्गंधी सुटली आहे.यामुळे नगरपंचायत कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्रासाचे झाले होते. कार्यालयाशेजारी साठवलेला कचरा उचलून जागा साफ करण्याचेही जाहीर केले होते.


नागरिकांच्या जीवाशी खेळ

पावसाळ्यात विविध साथीच्या आजारांना आमंत्रण मिळते. यातून कशी काळजी घेतली जावी, यासाठी विविध पातळीवर प्रशासन जनजागृती करीत असते. मात्र, येथील शहरातील अवस्था पाहिल्यास नगरपंचायत कार्यालयाशेजारीच कचरा साठवून नगरपंचायत प्रशासन काय संदेश देवू इच्छिते असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.

आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक

नगरपंचायत कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याच्या निमित्ताने तसेच अन्य काही कामाच्या निमित्ताने नागरिक सतत ये-जा करीत असतात. अशावेळी कार्यालयाशेजारीच साठवेला कचरा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक बनत चालला आहे. याबाबत नागरिकांमध्ये कमालीचा संताप असल्याचे दिसून येत आहे.