तेंडोलीतील रस्त्यांची दुरवस्था ; साईडपट्टीच खचली

Edited by: रोहन नाईक
Published on: July 03, 2023 15:43 PM
views 118  views

कुडाळ : दीर्घ विश्रांतीनंतर जोरदार सुरु झालेल्या पावसाचा फटका तेंडोली भोमपूल ते तळेवाडी नजीकच्या रस्त्याला बसला आहे. या रस्त्याच्या कडेने मे महिन्याअखेर केबल लाईन घालण्यात आली होती. परंतु, जोरदार पावसामुळे या रस्त्याच्या कडेची साईडपट्टीच खचली आहे.  त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने संबंधित प्रशाससाने लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून होत आहे. 

 तेंडोली गावातील इंटरनेट केबलचे काम मे महिनाअखेर  पूर्ण करण्यात आले होते. सध्या पावसामुळे तेंडोली भोमपूल ते तळेवाडीनजीक रस्त्याच्या कडेची साईटपट्टी खचली आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तेथील भाग १५ ते २० फूट खोल आहे. आंदुर्ले, मळई, तेंडोली, माड्याचीवाडी या ठिकाणच्या वाहनांची सतत या रस्त्याने रहदारी सुरु असते. तसेच ट्रक,  एसटी वाहतूकही या रस्त्याने सुरु आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून रस्त्यावर सुरक्षितेच्या दृष्टीने म्हणून बॅरल  उभे करून ठेवले आहेत. तर काही ठिकाणी वाहनेसावकाश हाका एकेरी वाहतूक सुरु आहे,  असा फलकही लावला आहे. 

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. शाळाही सुरु झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने लहान मुलांची सतत ये-जा सुरु असते. त्यामुळे  अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठी अवजड वाहने या रस्त्याने जाऊन येथील काही भाग खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघात होण्याच्या अगोदर संबंधीत प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून होत आहे.