
सावंतवाडी : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून अखेर सावंतवाडी नळपाणी योजनेला राज्य सुवर्ण जयंती योजनेमधून 56 कोटी 17 लाख रुपये मंजूर झालेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेचा पाणी पुरवठा प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत राज्यस्तरीय मान्यता समितीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता. या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे विभाग यांनी चालू दरसूचीनुसार तांत्रिक मान्यता दिलेली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आभार मानले आहेत.
रविंद्र चव्हाण यांनी नळपाणी योजना 56 कोटी 17 लाख रुपयांची मंजुरी मिळून दिली. अशाच पालकमंत्र्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याला गरज आहे, पालकमंत्र्यांच त्रिवार अभिनंदन असं मत बबन साळगावकर यांनी व्यक्त केले आहे. 2018 पासून प्रलंबित असलेली नळपाणी योजना रविंद्र चव्हाण यांनी तीन महिन्यांमध्ये मार्गी लावली त्यासाठी रवींद्र चव्हाण यांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानणार असल्याचं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.