
सावंतवाडी : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून अखेर सावंतवाडी नळपाणी योजनेला राज्य सुवर्ण जयंती योजनेमधून 56 कोटी 17 लाख रुपये मंजूर झालेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेचा पाणी पुरवठा प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत राज्यस्तरीय मान्यता समितीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता. या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे विभाग यांनी चालू दरसूचीनुसार तांत्रिक मान्यता दिलेली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आभार मानले आहेत रविंद्र चव्हाण यांनी नळपाणी योजना 56 कोटी 17 लाख रुपयांची मंजुरी मिळून दिली. अशाच पालकमंत्र्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याला गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केल.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, २०१८ ला में आयकॉन नासिक यांच्याकडून या योजनेचा आराखडा तयार करून घेतला होता. याचे ४८ लाख रुपये शासनाकडे वर्ग केले होते. नळपाणी योजना मंजूर होती. परंतु, काही कारणास्तव या योजनेकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत होते. ही योजना जाणीवपूर्वक बाजूला काढून ठेवली होती. ३ महिन्यांपूर्वी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबद्दल माहिती दिली. त्यांनी केवळ तीन महिन्यांत धाडसी निर्णय घेऊन शहरासाठी ५६ कोटी १७ लाख रुपये मंजूर करत धाडसी निर्णय घेतला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यासाठी अभिनंदनास पात्र असून शहराला चांगलं व मुबलक पाणी मिळण्यासाठी मदत होईल. चार ठिकाणी हायटेक टाक्या उभारल्या जातील. संपूर्ण शहराची लाईन बदलली जाणार आहे. लाईनसह ग्राहकांपर्यंत नवीन लाईन टाकली जाणार आहे. वाया जाणाऱ्या ३७ टक्के पाण्याची बचत होणार आहे. पाळणेकोंड येथील फिल्टरेशन प्लान पूर्णपणे अद्ययावत असा तयार होईल. स्वच्छ व निर्मळ पाणी शहरवासीयांना मिळणार असून यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानणार आहे.
या योजनेकडे स्थानिक आमदार तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लक्षच दिला नाही. मी आंदोलनात्मक भुमिका घेतल्यानंतर 'निधी तसा मिळत नाही' अशी भुमिका विद्यमान मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली. तुम्ही पालकमंत्री असताना अपेक्षा तुमच्याकडून नाही करायची तर कुणाकडून करायची ? असा सवाल बबन साळगावकर यांनी केला. निधी तसा मिळत नाही असं म्हणत खिल्ली उडविली. पण, आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी करून दाखवलं. मी त्यांच्या पक्षाचा नाही. परंतु, सतत या योजनेचा पाठपुरावा करत होतो. रविंद्र चव्हाण ही योजना मंजूर करतील असा विश्वास देखील व्यक्त केला होता. कारण, माझा निवेदनानंतर त्यांनी पालघर व सावंतवाडीची बैठक घेत अधिकाऱ्यांना सक्त सुचना दिली होती. आज त्यांनी ही योजना मार्गी लावली त्यांचे प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानणार असं साळगावकर म्हणाले. तर दीपक केसरकर यांचा मी विरोधक नाही. दीपक केसरकर यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण, त्यांच्या हुशारीचा व अभ्यासपूर्ण कौशल्याचा उपयोग विकासाला झाला नाही. विकासात्मक अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत. जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून नारायण राणेंनी अनेक धाडसी निर्णय घेतले. ते धाडस रविंद्र चव्हाण यांच्यात दिसत आहे. ते जिल्ह्याला न्याय देतील. त्यामुळे त्यांचासारखा पालकमंत्री सिंधुदुर्गला हवा असं माझं मत आहे. दीपक केसरकर यांनी बैठका अनेक घेतल्या. पण, ठपका अधिकाऱ्यांवर ठेवला. ते मिटिंगा घेतात पण निर्णय घेत नाहीत असं अधिकाऱ्यांच मत होतं. निधी आणून देखील विकासात्मक निर्णय घेण्यात दीपक केसरकर कमी पडले हे सत्य नाकारता येणार नाही. मी इथेच न थांबता सावंतवाडी शहर व परिसराला २४ तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी आग्रही राहणार आहे. २५ वर्ष बंद असलेले शिरशिंगे धरणाच काम फॉरेस्टमुळे थांबलेल आहे. त्याबाबत रविंद्र चव्हाण यांची भेट घेत शिरशिंगेच पाणी शहरासह आजूबाजूच्या गावांना मिळावं यासाठी प्रयत्न करणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.