बबन साळगावकरांनी जागवल्या मनोहर जोशींच्या आठवणी..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 23, 2024 05:14 AM
views 114  views

सावंतवाडी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशींच वयाच्या ८६ व्या वर्षी निधन. हृदयविकाराचा धक्का आल्याने इस्पितळात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व तत्कालीन शिवसैनिक बबन साळगावकर यांनी आदरांजली वाहिली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी हे शिवाजी चौक येथील सावंतवाडी तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथील शाखेच्या उद्घाटनासाठी १९९६ साली आले होते. शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, वक्तशीरपणा स्पष्टवक्ते हजरजबाबीपणा असणारे ते ज्येष्ठ नेते होते. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला रोजगार मिळावा यासाठी कोहिनूर इन्स्टिट्यूट सुरू केली.

या माध्यमातून त्यांनी अनेक मराठी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते लोकसभा सभापती म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका कार्यक्रमात बोलत असताना असंसदीय भाषेमध्ये बोलले. स्टेजवरून उतरल्यानंतर पत्रकार विचारलं या मताशी तुमचं मत काय हजरजबाबी मनोहर पंत पटकन म्हणाले, मी काही ऐकलं नाही. ते शिवसेनेचे एकनिष्ठ राहिले. बाळासाहेबांचे विश्वासू सतत रुबाबात वावरणारा हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी आदरांजली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी वाहिली.