'आयुष्मान भव'चा कणकवलीत शुभारंभ

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 13, 2023 20:23 PM
views 244  views

कणकवली : केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या विविध योजना आहेत. या योजनांची माहिती सर्व स्तरावर पोचवण्याचे काम आरोग्य यंत्रणा करत आहेत. तरी आरोग्य व सामाजिक चळवळीत काम करणाऱ्यांना त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. विद्याधर तायशेटे यांनी केले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 'आयुष्मान भव' उपक्रमाचा तालुकास्तरीय शुभारंभ येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सभागृहात बुधवारी  डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी प्रणोती इंगवले, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. अनिकेत किर्लोसकर, आरोग्य सेवक प्रशांत बुचडे, एस. एस. ठाणेकर, एम. वाय. कदम, सागर चव्हाण, किरण रासकर, भक्ती पडते, श्रीमती खानोलकर यांच्यासह रुग्णालयातील पारिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

प्रणोती इंगवले म्हणाल्या, 'आयुष्मान भव' हा आरोग्य सेवा सर्वांपर्यंत व्यापकपणे पोहोचण्याचा देशव्यापी उपक्रम आहे. ज्याचा उद्देश प्रत्येक गावात आणि शहरापर्यंत पोहोचणे आहे. हा उपक्रम १३ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या अंतर्गत सर्वांना आभा आयडी कार्ड, आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून देणे, आरोग्य विषयक व देह दानासाठी जनजागृती करणे, प्राथमिक स्तरावर आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे आयोजित करणे असे उपक्रम घेण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांच्या सर्वांनी लाभ घ्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुक्यातील तिघांना प्राथमिक स्वरूपात आभा कार्डचे वाटप करण्यात आले.