आयुर्वेद संस्थानचे आरोग्य विषयक उपक्रम कौतुकास्पद : युवराज लखम सावंत भोसले

Edited by: विनायक गावस
Published on: March 12, 2024 12:59 PM
views 50  views

सावंतवाडी : संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे शाश्वत उपचार आहेत. त्यामुळे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आयुर्वेदाचे तज्ञ डॉक्टर घडविण्यासह आयुर्वेदाचा प्रसार व प्रचारासह राबवित असलेले आरोग्य विषयक उपक्रम कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थांनचे युवराज श्रीमंत लखम सावंत भोसले यांनी केले.

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, देवसू शेंडोबा माऊली ग्रामसंघ आणि सामाजिक कार्यकर्ते तारकेश सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने  देवसू येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी युवराज लखम सावंत भोसले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे येथील उद्योजक संदीप घारे, सावंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक दळवी, एल एम सावंत, दीनानाथ कशाळकर, विवेक गवस, गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ प्रशांत ससाणे, डॉ प्रसाद नार्वेकर, डॉ राजेश ऊईके, डॉ पूजा गावडे, डॉ दीपा शिरोडकर, टेक्निशियन मनीषा देसाई, पारपोली उपसरपंच संदेश गुरव, देवस्थान मानकरी हनुमंत सावंत, तुकाराम सावंत, प्रकाश मुरकर, मंगेश परब, जनार्दन जाधव, शेंडोबा माऊली ग्राम संघाच्या अध्यक्षा स्मिता देसाई, खजिनदार संगीता परब, रसिका सावंत, शाळा व्यवस्थापन समिती बाबुराव देऊसकर आणि सामाजिक कार्यकर्ते  तारकेश सावंत, मंजिरी बांदेकर आदी उपस्थित होते.

 यावेळी युवराज लखम सावंत यांनी गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानची आयुर्वेदिक औषधांची सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करण्यासाठी  प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी संदीप घारे यांनी आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार हे चिरकाल टिकणारे असल्याचे सांगितले. डॉ प्रशांत ससाणे यांनी गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान या ठिकाणी आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर घडवण्यासह एकूण १४ विभागामार्फत रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊ नये यासाठी काम केले जाते. आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर ती जीवन जगण्याची शैली आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन केले. या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी केली. तसेच या शिबिरात काही रुग्णांची मधुमेह तपासणी करून उपचार करण्यात आले. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता डॉ सुजाता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवसू प्राथमिक शाळेत  घेण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देवसू गावातील सुमारे २५० आबालवृद्धांनी लाभ घेतला. या शिबिरात रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराचे नियोजन  सुमित सावंत, सहदेव सावंत, दादू सावंत, दिनेश सावंत, प्रकाश सावंत, विठ्ठल सावंत, दिगंबर सावंत, सुनिल खानोलकर, पांडुरंग सावंत,आनंद सावंत, सुरेंद्र देसाई, समीर शिंदे आणि तारकेश सावंत यांनी केले होते.

दरम्यान, यावेळी सावंतवाडी येथील डॉ गद्रे रुग्णालय व लेसर सेंटर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा १९६ रुग्णांनी लाभ घेतला. यासाठी मानसी सावंत सचिन पाडलोसकर, समिज्ञा परब, महेश सावंत, रोशनी सावंत यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन देवसू शाळेचे मुख्याध्यापक प्रविण ठाकूर यांनी तर आभार तारकेश सावंत यांनी मानले.