
वेंगुर्ले : ऐतिहासिक व पुरातन वास्तू या इतिहासाच्या ठेवी असुन या वास्तूंचे जतन करण्यासाठी दुर्ग महर्षी गो. नी. दांडेकर यांच्या सारख्या अनेक व्यक्ती झटत आहेत पणे त्यांचे प्रयत्न आज एकाकी पडताना दिसतात. महाराष्ट्र म्हणून किल्ले संवर्धनाला आपण पुरेसे महत्व दिले पाहिजे. आपल्या गड आणि किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपल्या वारशाचे जतन हे आपणच करायला पाहिजे असे प्रतिपादन वेंगुर्ले नायब तहसीलदार राजन गवस यांनी वेंगुर्ले येथे केले.
कोट उर्फ डच वखार या भुईकोट किल्ल्यावर दुर्ग महर्षी गो. नी. दांडेकर यांच्या जन्म दिनानिमित्त अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघटना संचलित सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना व जनसेवा प्रतीष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गड स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजन गवस बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचे उपाध्यक्ष व जनसेवा प्रतीष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, गड प्रेमी डॉ. प्रल्हाद मणचेकर, सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, वेंगुर्लेच्या सदस्या सिमंतीनी मयेकर, वेंगुर्ले कोट पहारेकरी आनंद मिंडे, कार्तिक दरेकर, मानसी देसाई, सोनिया चव्हाण व जनसेवा प्रतीष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
ज्येष्ठ दुर्ग महर्षी लेखक गो. नि. दांडेकर यांचा जन्मदिवस अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने " गो नि दां दुर्गवारी दिन" म्ह्णून साजरा केला जातो. गो . नी. दांडेकर यांनी महाराष्ट्रातील आबालवृद्धांची पावले डोंगरांकडे, गडकिल्ल्यांकडे वळवली , छत्रपती शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने ,मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमाने पावन झालेल्या गडकोटांची आवड महाराष्ट्राच्या तमाम जनतेला लावली. यावर्षी गडकोटांच्या स्वच्छता व वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण समितीचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष ऋषिकेश यादव, सचिव डॉ. राहुल वारंगे, सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचे अध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण, सचिव प्रा. एस्. एन्. पाटील यांनी मार्गदर्शन केले.