वेंगुर्ले : जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे यावर्षीपासून जागृती गौरव पुरस्कार देण्यात येणार असून या पुरस्कारासाठी वेंगुर्ले येथील ज्येष्ठ साईनबोर्ड आर्टिस्ट तथा मूर्तीकार सुदर्शन कुडपकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गतवर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या जागृती आयडॉल पुरस्कारांसाठी पूर्वाश्रमीच्या तळेरे गावच्या जोत्ना जाधव व शिरोडा गावच्या रंजिता परब यांची निवड करण्यात आली आहे.
वेंगुर्लातील पत्रकार संजय मालवणकर यांनी ४० वर्षापूर्वी स्थापन केलेल्या या जागृती कला क्रीडा मंडळाचा ३६ वा जागृती महोत्सव यावर्षी १८ व १९ रोजी होणार आहे. बालवाडी ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचा सामावेश असलेला हा महोत्सव वेंगुर्लेतील छोट्या मुलांचे हक्काचे व्यासपीठ असते. पालकांनाही आपले कलागुण प्रदर्शित करण्याची संधी मिळते. या महोत्सवाचे औचित्य साधून या वर्षांपासून जागृती गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
पहिल्याच पुरस्कारासाठी वेंगुर्ले शहरात त्याकाळी साईनबोर्ड रंगवून कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्राची सेवा करणारे मूर्तीकार सुदर्शन कुडपकर यांची निवड करण्यात आली आहे. फ्लेक्सच्या जमान्यापूर्वी व नंतरचीही काही वर्षे वेंगुर्लात कोणताही कार्यक्रम किंवा उपक्रम असला की सुदर्शन उर्फ सुदू कुडपकर यांचा साईनबोर्ड ठरलेला असायलचा चौकोणी लाकडी फ्रेमवर कापड ताणून त्यावर काळा रंग मारुन त्या त्या कार्यक्रमाचा रंगीत व कलात्मक बोर्ड तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. वेंगुर्लात पूर्वी नटराज टॉकीजही होते. दर आठवड्यात नव्याने लागण्याऱ्या चित्रपटाचे बोर्डडी कुडपकर रंगवत असतं. निवडणुकांच्या काळात ते रात्रदिवंस काम करून अनेक साईनबोर्ड तयार करत असतं. वाडिलोपार्जित गणेशमूर्ती शाळा चालविण्याचा त्यांचा व्यवसाय आजही चालू आहे. गेली साठ वर्षे त्यांच्याकडून होत असलेल्या कलेच्या सेवेची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
जागृतीच्या क्रीडापटू जोत्स्ना, रंजिता यांना जागृती आयडॉल
गतवर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या जागृती आयडॉल पुरस्कारासाठी यावर्षी मूळ तळेरे गावची व त्याकाळी वेगुर्त्यात राहणारी क्रीडापटू ज्योत्स्ना शांताराम जाधव (सौ. ज्योत्स्ना विशाल साटम) व शिरोडा गावची विविध खेळात पारंगत असलेली रंजिता नामदेव परब (सौ. प्राजक्ता प्रकाश गावडे) यांची निवड करण्यात आली आहे. जोत्स्ना या सध्या कायनान्स क्षेत्रात काम करत असून त्यांनी वेंगुर्लेत असताना जागृती मंडळाच्या माध्यमातून विविध खेळात सहभाग घेऊन पारितोषिके पटकाविली आहेत. तर पूवाश्रमीच्या रंजिता जाधव सध्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. २०२१ मध्ये त्यांनी गावचे उपसरपंचपदही भूषविले आहे. २००० साली त्यांनी वेंगुर्त्यांतील खर्डेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच जागृती मंडळाच्या माध्यमातून विविध खेळांचे प्रतिनिधीत्व केले आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात वेंगुर्लेचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, खो-खो, कबड्डी आदी खेळांमध्ये अनेक पारितोषिके पटकाविली आहेत. प्रशिक्षक व पंच म्हणूनही त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. हे सर्व पुरस्कार जागृती महोत्सवात म्हणजेच १८, १९ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती जागृतीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी दिली.