कणकवली पत्रकार संघाला आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्रदान

परभणी-सेलूत मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कारांचे वितरण
Edited by:
Published on: February 01, 2025 19:54 PM
views 31  views

कणकवली : मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्यावतीने दिल्या जाणाऱ्या रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श  तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण शनिवारी परभणी जिल्ह्यातील सेलू येथील साई नाट्यगृह येथे एका शानदार कार्यक्रम करण्यात आले. यामध्ये कणकवली तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख, किरण नाईक, न्यूज चॅनेलचे अँकर विशाल परदेशी यांच्या हस्ते आदर्श तालुका  पत्रकार संघ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 कणकवली तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचा कोल्हापूर विभागाचा आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. परभणी सेलू येथे शनिवारी राज्यातील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूर शेख, परभणी जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस मोहम्मद इलियास, सेलू तालुका पत्रकार संघाचे  अध्यक्ष लक्ष्मण बागल, सेलूच्या प्रांताधिकारी संगीता सानप यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी, परभणीतील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच राज्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मराठी पत्रकार परिषदेने कणकवली तालुका पत्रकार संघाचा गौरव केला. यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे, संघाचे सचिव माणिक सावंत, उपाध्यक्ष अनिकेत उचले, सदस्य उमेश बुचडे उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी राज्यातील तालुका पत्रकार संघ चांगले काम करतात, त्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी या उद्देशाने गेल्या दहा वर्षापासून तालुका पत्रकार संघांना मराठी पत्रकार परिषदेकडून गौरवण्यात येत आहे. राज्यातील पत्रकारांच्या हक्कासाठी मराठी पत्रकार परिषद नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी अध्यक्ष अजित सावंत यांनी हा सन्मान कणकवली तालुक्यातील सर्व पत्रकारांचा असून पत्रकार संघाने गेल्या अनेक वर्षात पत्रकारांसाठी जे विविध उपक्रम राबवले. त्याचबरोबरच जे सामाजिक काम केले त्याची दखल घेऊन पत्रकार संघाला हा सन्मान मिळाल्याचे अध्यक्ष अजित सावंत यांनी सांगितले.