
पुणे : कुटुंबातील प्रत्येकाच्या दैनंदीन जीवनाशी निगडीत अनुभव आणि त्याची अत्यंत ओघवत्या तसेच प्रभावी शैलीत मांडणी असलेला लेखिका सौ. अंजली धस्के यांचा पहिला कथासंग्रह म्हणजे ’पिक्चर परफेक्ट’. अल्पावधित लोकप्रिय ठरलेल्या या कथासंग्रहाला साहित्य क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार मिळाला आहे.
कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठाणच्यावतीने ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक, 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते मंचर येथे दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार अंजली धस्के यांना प्रदान करण्यात आला.
कथालेखन हा एक अत्यंत चांगला साहित्य प्रकार आहे. यात सध्याच्या अत्याधुनिक जीवनाचे प्रतिबिंब येणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे अनेक प्रश्न, समस्या तसेच दैनंदीन जीवनातील हलके फुलके क्षण यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलुन जातो. त्यानुसार सौ. अंजली धस्के यांचा हा कथासंग्रह अत्यंत वाचनीय आणि प्रत्येकाने आपल्या घरात जपुन ठेवावा, असाच आहे, अशा शब्दात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी या कथासंग्रहाचे कौतुक केले. दरम्यान, या पुरस्काराबददल लेखिका अंजली धस्के यांचे कौतुक होत आहे.











