
मालवण : गेले अनेक वर्षे सायकलवरुन चहा नाश्ता विक्री करून आपल्या कुटुंबाचा चारितार्थ चालविणाऱ्या मालवणमधील सौ. अनिता आळवे यांच्या आदर्शवत कार्याची दखल घेऊन कोकण एनजीओ इंडिया (कोकण कला व शिक्षण विकास संस्था) या संस्थेकडून सौ. आळवे यांना 'यु इन्स्पायर' पुरस्कार जाहीर झाला आहे. 'कोकणसाद LIVE' च्या शक्तिरूपा या विशेष कार्यक्रमातून तिची संघर्षमय वाटचाल दाखवली होती. त्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता.
मालवणच्या रहिवासी सौ. अनिता आळवे या गेली अनेक वर्षे मालवण शहर व परिसरात सायकलने फिरून चहा, कॉफी व नाश्त्याच्या खाद्यपदार्थाची विक्री करत आहेत. तसेच विविध कार्यक्रमासाठी नाश्त्याच्या ऑर्डरही घेतात. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातूनच त्यांनी आपला उदरनिर्वाह करतानाच मुलांचे शिक्षणही पूर्ण केले. आजही त्या आपला हा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल यापूर्वीही काही संस्थांनी घेत त्यांना सन्मानित केले आहे. कोकण एनजीओ इंडिया ही भारतातील एक आघाडीची एनजीओ असून भारताच्या प्रगतीसाठी कार्य करत आहे. या संस्थेने सौ. आळवे यांच्या कष्टाची दखल घेत 'यु इन्स्पायर' हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृ, दादर (पश्चिम) शिवाजी पार्क, मुंबई येथे आयोजित कोकण कला महोत्सवात करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल सौ. आळवे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.











