
सावंतवाडी : ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीच्या पुरस्कार प्राप्त सदस्यांचा सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जावेद शेख, निलेश पारकर, एस.व्ही.भुरे, वैभव केंकरे, विनायक गांवस यांना ज्ञानदीपकडून मायेची शाल प्रदान करण्यात आली. अँड. अरूण पणदुरकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, ज्ञानदीपचे संस्थापक वाय.पी.नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. कळसुलकर इंग्लिश स्कूल प्रशालेत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
येथिल कळसुलकर इंग्लिश स्कूल प्रशालेत हा सोहळा संपन्न झाला. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख यांना आदर्श क्रीडा पुरस्कार, क्रास्ट्राईब शिक्षक संघटनेचा आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार ज्ञानदीपचे कार्याध्यक्ष निलेश पारकर, कळसुलकरचे मुख्याध्यापक एस.व्ही.भुरे, वरिष्ठ लिपिक वैभव केंकरे यांना तर आदर्श पत्रकार पुरस्कार सहसचिव विनायक गांवस यांना प्राप्त झाला. ज्ञानदीपच्या सदस्यांचा विविध संघटनांनी दखल घेत पुरस्कार जाहीर केल्यानंतर ज्ञानदीप मंडळाकडून पुरस्कार प्राप्त सदस्यांचा मायेची शाल प्रदान करत अँड. अरूण पणदुरकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, ज्ञानदीपचे संस्थापक वाय.पी.नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले, आजकाल समाजातला विश्वासाचा धागा कमी होत आहे. मात्र, ज्ञानदीपच्या कार्यक्रमातून हा विश्वासाचा धागा कायम ठेवला गेला आहे. आजच्या कार्यक्रमातून ते दिसून आलं असे प्रतिपादन श्री.लोंढे यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अँड अरूण पणदुरकर म्हणाले, प्रत्येक व्यक्तीत संवेदनशीलता असतेच असं नाही. मात्र, आजच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांत ती संवेदना दिसून आली. आजच्या काळात संवेदनशीलतेची प्रचंड आवश्यकता आहे. दुर्गम भागात स्त्री- पुरुषात अद्यापही समानता दिसून येत नाही. तृतीय पंथींना समाज अजूनही माणूस म्हणून स्वीकारत नाही आहे. त्यांच्याही व्यथा समजून घेणं आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केल. तसेच अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाविषयीची माहिती देत जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
पुरस्कार प्राप्त मान्यवरांपैकी निलेश पारकर, एस व्ही भुरे, वैभव केंकरे आदींनी मनोगत व्यक्त करताना आभार व्यक्त केले. आजवर अनेक पुरस्कार व सन्मान सोहळे स्वीकारलेत. परंतू, हा माझा घरचा सत्कार माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. माझे पितृतुल्य व ज्ञानदीप संस्थेचे संस्थापक नाईक यांच्यामुळेच आज जिल्हाभरात विशेष ओळख मिळाली आहे अशी भावना निलेश पारकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अँड. अरूण पणदुरकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक वाय.पी.नाईक, अध्यक्ष जावेद शेख, खजिनदार एस. आर. मांगले, मुख्याध्यापक एस.व्ही. भुरे, कार्याध्यक्ष निलेश पारकर, मुख्याध्यापक प्रदीप सावंत, वरिष्ठ लिपिक वैभव केंकरे, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष अनिल राणे, सहसचिव विनायक गांवस, व्ही आर घोरपडे, मल्ल सम्राटचे ललित हरमलकर, सिद्धेश कुलकर्णी, अनिल ठाकुर, गौरव कुडाळकर, आर. व्ही. घोरपडे, साबाजी परब आदी उपस्थित होते. प्रास्ताविक वाय.पी. नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल ठाकुर, आभार प्रदीप सावंत यांनी मानले.