'ऐकणारा नव्हे, प्रत्युत्तर देणारा भारत'

अविनाश धर्माधिकारी यांचे चिपळूणमध्ये परखड प्रतिपादन
Edited by: मनोज पवार
Published on: June 25, 2025 20:02 PM
views 155  views

चिपळूण : "२०१४ पूर्वीचा भारत शांतपणे सहन करणारा होता, परंतु आजचा भारत हा अरेला कारे म्हणणारा आहे. आता देशावर जर दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर भारत शांत बसणार नाही, उलट त्यांच्यावर थेट कारवाई करणार. ही नवी प्रतिमा भारताची आहे. देश सुरक्षित ठेवायचा असेल, तर प्रत्येक नागरिकाने सतर्क राहिले पाहिजे. एक सावध नागरिक हीच देशाची खरी शक्ती आहे," अशा शब्दांत माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी भारताच्या बदललेल्या भूमिकेचे रोखठोक विश्लेषण केले.

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे 'ऑपरेशन सिंदूर : पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व' या विषयावर धर्माधिकारी यांचे व्याख्यान मंगळवारी (२४ जून) सायंकाळी चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला चिपळूणकरांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. सभागृह खचाखच भरले होते. अनेकांनी उभं राहून दीड तास हे विचारगर्भ विवेचन ऐकले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत होते. प्रास्ताविक चतुरंग प्रतिष्ठानचे अजित आगवेकर यांनी केले. गोवा, रत्नागिरीनंतर चिपळूण हे या व्याख्यानमालेतील तिसरे ठिकाण होते.

धर्माधिकारी म्हणाले, "पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताच्या प्रत्युत्तराची कल्पना होती, तरीही दहशतवादी हल्ला झाला. भारताने थांबून न राहता केवळ १८ मिनिटांत सात दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत पाकिस्तानच्या सैन्य तळांना न छेडता थेट दहशतवाद्यांवर प्रहार करण्यात आला. हे युद्धतंत्राचे प्रगल्भ उदाहरण आहे. भारताने युद्ध जिंकले, परंतु त्यानंतर झालेली शस्त्रसंधी ही दुर्दैवी बाब ठरली. आपण युद्धात जिंकतो, पण तहात गमावतो, हा भारताचा इतिहास आहे."

मुंबईवरील २६/११ चा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, "तेव्हाही गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्याच्या आधीच सविस्तर इशारे दिले होते. तरीही काहीच कारवाई झाली नाही. करकरे, कामटे, साळसकर, ओंबळे यांसारखे शूर अधिकारी आपण गमावले. मात्र २०१४नंतर भारताची भूमिका बदलली. आता हल्ला झाला, की त्याला त्वरित व ठोस उत्तर दिले जाते."

पाकिस्तानच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, "पाकिस्तान हा एक असा देश आहे, जिथे सैन्याला देश आहे. तेथे लोकशाहीची पाळेमुळे कधीच रुजली नाहीत. त्यांची सत्ता केवळ लष्कराच्या हातात आहे. आज त्यांनी जे दहशतवादी पाळले आहेत, तेच त्यांच्या विरोधात उठतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या या धोरणाला खतपाणी घालणारा देश म्हणजे अमेरिका आहे. भारत महासत्ता बनू नये, म्हणून तो भारताला सतत दहशतवादात गुंतवतो. मात्र भारताला रोखण्याचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत."

"पाकिस्तान वेगळा करणे, हे ब्रिटिशांचे योजनाबद्ध पाऊल होते. भारतावर एक कायमचा शत्रू तयार करण्यासाठी पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. ब्रिटिशांच्या दस्तऐवजांत याचे पुरावे सापडत आहेत. हे धोरण अजूनही कायम आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताने संरक्षण क्षेत्रात घेतलेली झेप अधोरेखित करताना धर्माधिकारी म्हणाले, "आता आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करत आहोत. संरक्षण क्षेत्रात आपण परावलंबी नाही. उलट आता इतर देशांनाही आपण शस्त्रास्त्रे पुरवतो. अंदमानच्या सागरात नव्याने आढळलेले तेलसाठे देशासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. येत्या दीड वर्षात आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू, असा विश्वास बळावतो आहे."

"आपल्या देशात ६० कोटी क्रयशक्ती असलेली लोकसंख्या आहे. गरिबी कमी झाली आहे. आपली अर्थव्यवस्था बळकट होत आहे. आपले संशोधन आता मूळतत्त्वांवर आधारित असले पाहिजे. जागतिक महासत्ता होण्यासाठी आपल्याकडे सर्व क्षमता आहे," असे मत त्यांनी मांडले.

कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी पुन्हा एकदा सर्व सामान्य नागरिकांना आवाहन केले की, "आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे. जागरूक नागरिकच देशाच्या सुरक्षेसाठी पहिला भिंत बनतो. आपल्या छोट्या कृतींमुळेही मोठा बदल शक्य आहे."

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी चतुरंगच्या विद्याधर निमकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानाची सांगता राष्ट्रगीत 'वंदे मातरम' ने करण्यात आली.