
वैभववाडी : राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यातील अधिकारी दडपणाखाली आले आहेत.गेली सात आठ वर्षे भयमुक्त असणाऱ्या जिल्ह्यात राडा संस्कृती पुन्हा डोके वर काढत आहेत.येथील अधिकाऱ्यांना घरी बोलावुन स्थानिक सत्ताधारी आमदार धमकावत आहेत.त्याचा परिणाम अधिकाऱ्यांच्या मनोबलावर होणार असुन त्याचा विपरित परिणाम जिल्हयाच्या विकासावर होणार आहे.यासंदर्भात आपण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार असुन अशा प्रवृत्तीना वेळीच निर्बंध घालावा अशी मागणी करणार असल्याची माहीती शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी येथे केली.
येथील शासकीय विश्रामगृहावर श्री.रावराणे यांची पत्रकार परिषद झाली.यावेळी त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख मंगेश लोके,माजी सभापती लक्ष्मण रावराणे,संदीप सरवणकर,माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे,नगरसेवक रणजित तावडे,सुनील रावराणे,शिवाजी राणे,स्वप्निल रावराणे आदी उपस्थित होते.
श्री.रावराणे म्हणाले जिल्हयाची सत्ता राणे कुटुंबाकडे असताना जिल्हयातील सर्व अधिकारी नेहमी मानसिक दडपणाखाली असायचे.त्यानंतर राज्यात शिवसेना भाजपाची सत्ता आल्यानंतर अशा प्रवृत्तीना रोखण्याचे काम करण्यात आले.राज्यात महाविकाकस आघाडी सरकार आल्यानतंर राडा,धाकदपटशहा करणाऱ्या प्रवृत्तीना आळा घालण्याचे काम सरकारने केले.परंतु आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा या प्रवृत्तीनी डोके वर काढले असल्याचा आरोप करीत आमदार नितेश राणेवर निशाणा साधला.विकास कामांचा आढावा शासकीय कार्यालयात न घेता ते आपल्या घरी घेत आहेत.आता आमची सत्ता आली आहे हे सांगत ते अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.अशा पध्दतीने धमकावण्याचे प्रकार सुरू राहीले तर चांगले अधिकारी जिल्हयात थांबणार नाहीत.अधिकाऱ्यांना दादागिरी करण्याची त्यांना पुर्वीपासुन सवय आहे.माजी आमदार प्रमोद जठार यांनी अनेकदा त्यांचा उल्लेख आपल्या भाषणातुन काही वर्षापुर्वी केलेला आहे.त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे आणि अधिकाऱ्यांचे मनोबल खचेल असे प्रकारांना थारा देवु नये.
मंत्री चव्हाण यांच्या माध्यमातुन भाजपाला प्रथमच पालकमंत्री पद मिळाले आहे.त्यामुळे भाजपाच्या निष्ठावन कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.परंतु राणेसमर्थकांमध्ये तो उत्साह दिसुन येत नाही.राणेंनी भाजपात प्रवेश केल्यापासुन नवे जुने असे गट सक्रीय असल्याची टीका देखील त्यांनी केली.
जिल्ह्यात यापूर्व असलेले पालकमंत्री हे राणेकुटुबीयांसाठीच काम करीत होते.जनतेच्या कामापेक्षा राणेंची कामे प्राधान्याने व्हायची. असा टोला मंत्री उदय सामंत यांना लगावला.नवीन पालकमंत्र्यांनी जिल्हावासीयांना न्याय द्यावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.