सिंधुदुर्गातील माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅन्टीन सुरु करण्याचा प्रयत्न

पालकमंत्री नितेश राणेंचं आश्वासन
Edited by:
Published on: May 31, 2025 18:49 PM
views 208  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी सीएसडी केंद्रीय सुविधा पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. 

दरम्यान, आमच्या जिल्हयात तब्बल पाच हजार माजी सैनिक व बारा हजार सैनिक कुटुंबिय आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज केंद्र व राज्य सरकार हे एकाच विचारांचे आहे. आपले खासदार नारायण राणे आहेत तर आम्ही देखील सत्तेत आहोत त्यामुळे लवकरच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.     

ते  म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिक यांच्या बद्दल आम्हाला अभिमान वाटतो. त्यांचे प्रश्न सोडविणे आमचे कर्तव्य आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत प्रश्न घेऊन जाईन व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष प्रश्न म्हणून दिल्ली दरबारी मांडू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सावंतवाडी विश्रामगृहावर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत गावडे आणि पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना.  नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सरचिटणीस महेश सारंग यांच्या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

माजी सैनिक संघटनेकडून बाबुराव कविटकर, शशिकांत गावडे, सुभाष सावंत, दीनानाथ सावंत, दीपक राऊळ, कृष्णा परब, भिवा गावडे, सुनील राऊळ, प्रकाश सावंत, अनंत सावंत, विश्वजीत सावंत, सगुण पास्ते, मोहन राऊळ, आप्पा राऊळ, संतोष सावंत, सहदेव राऊळ, दीपक राऊळ, सुधाकर नाईक आणि प्रल्हाद तावडे उपस्थित होते. 

यावेळी माजी सैनिक संघटनेचे शशिकांत गावडे यांनी जिल्ह्यातील सीएसडी कॅन्टीनच्या समस्येकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.  यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात टी.ए. बटालियन, कोल्हापूर यांची सीएसडी कॅन्टीन सुरू होती. परंतु, काही कारणास्तव १४ फेब्रुवारी २०१९ रोजी टी.ए. बटालियन, कोल्हापूर यांचे युनिट हलवल्यामुळे सावंतवाडी येथील कॅन्टीन कोल्हापूर येथे हलवण्यात आली. यामुळे गेली सात ते आठ वर्षे कॅन्टीन सुविधा नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५ ते ६ हजार कॅन्टीन कार्डधारक माजी सैनिक या सुविधेपासून वंचित आहेत. या माजी सैनिकांना कॅन्टीनसाठी बेळगाव, कोल्हापूर, कर्नाटक, गोवा तसेच इतर राज्यांमध्ये जावे लागत आहे. कॅन्टीन सुविधा पूर्ववत सुरू करण्यासाठी जी.के.सी. सब एरिया, पुणे तसेच टी.ए. बटालियन कॅन्टीन, कोल्हापूर यांच्याशी संघटनेद्वारे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, परंतु अद्यापपर्यंत कॅन्टीन सुविधा देण्यात आलेली नाही, असे गावडे यांनी सांगितले.

या भेटीत माजी सैनिक संघटनेने काही महत्त्वाच्या मागण्या पालकमंत्र्यांसमोर ठेवल्या:ओरोस येथे कॅन्टीनसाठी २ हजार स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असून, ती जागा उपलब्ध करून द्यावी. सीएसडी  कॅन्टीन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यासाठी खासदार नारायण राणे यांच्यामार्फत संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळवून द्यावी.

कॅन्टीनसाठी आर्मी दलाकडून २ कोटी रुपयांची गुंतवणूकदारांना करण्याची अट सांगितली जाते, ती शिथिल करून शासनाच्या फंडातून रक्कम उभी करून सुविधा देण्यास सहकार्य करावे. या मागण्यांवर सकारात्मक विचार करून, माजी सैनिकांच्या या मूलभूत गरजेकडे आपण जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो माजी सैनिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.