देवगडात हायस्यकूलमध्ये चोरीचा प्रयत्न !

पाच वर्गखोल्यांचे कुलूप तोडली !
Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 19, 2024 08:11 AM
views 228  views

देवगड : देवगड शहरातील तालुकास्कूल देवगड प्राथमिक शाळेच्या दोन इमारतीमधील एकूण पाच खोल्यांच्या दरवाजांचे कुलूप तोडले.  तसेच शेजारी असलेल्या गटसाधन केंद्राच्या हॉलच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.  या घटनेने देवगड शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार १८ मार्चला सकाळी ७.१० वाजता निदर्शनास आली. देवगड पोलीसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून चोरीप्रकरणी सोमवारी ठसेतज्ञ व श्वानपथकही दाखल झाले होते.

याबाबत मिळालेल्या माहीतीनूसार, देवगड शहरात जुने पोलीस ठाण्याजवळ असलेल्या तालुका स्कूल देवगड प्राथमिक शाळा नं.१ मध्ये चोरट्यांकडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सोमवारी निदर्शनास आले आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापक प्राजक्ता प्रदीप कुलकर्णी यांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या तक्रारीमध्ये सोमवारी सकाळी ७.१० वाजता शाळेच्या वेळेत खोल्या उघडत असताना इमारत क्रमांक २ मधील खोली क्रमांक १ व २ तसेच इमारत क्रमांक ३ मधील खोली क्रमांक १,२,३ व या इमारतींच्या शेजारीच असलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या गटसाधन केंद्राच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील हॉलचे कुलूप चोरट्यांनी कुठल्यातरी हत्याराने तोडून आत प्रवेश केला. यामध्ये एका खोलीतील असलेल्या शैक्षणीक साहीत्य ठेवणाऱ्या पेट्यांचीही कुलूपे तोडली. मात्र यातुन कोणतीही वस्तु चोरून न नेल्याचे निदर्शनास आले तर गटसाधन केंद्राच्या हॉलच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून आतील साहीत्य विस्कटून टाकलेले दिसले. मात्र कोणतीही वस्तू चोरीस न गेल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी दोन इमारतीच्या एकूण पाच खोल्यांची कुलूपे तोडली तर गटसाधन केंद्राच्या हॉलचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीत म्हटले असून या तक्रारीवरून देवगड पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.  या घटनेनंतर तात्काळ श्वानपथक तसेच ठसेतज्ञही दाखल होवून तपासाला सुरूवात केली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर करीत आहेत.