
सावंतवाडी : नारळाचं झाड कापून ठेवल्याने शिरोडा नाका परिसरात मोठी दुर्घटना घडली. कापलेला माड विद्युत पोलसह रस्त्यावर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही गंभीर घटना घडली नाही. या प्रकारानंतर नागरिक प्रचंड आक्रमक झाले. संबंधित माड कापणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, तोवर माड हटवू देणार नसल्याचा इशारा दिला. पोलीस निरीक्षकांच्या आश्वासनाअंती रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.
शहरातील शिरोडा नाका येथील एका विक्षिप्त व्यक्तीकडून माड कापून ठेवण्यात आला. प्रकाश शेटकर असं संबंधिताचे नाव असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. ब्लेडच्या सहाय्याने माड कापून ठेवल्यानं ही दुर्घटना घडली. यात लोकांचे नाहक बळी गेले असते. दैव बलवत्तर म्हणून काही लोक यातून बालंबाल बचावले.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दाखल होत घटनेचा आढावा घेतला. यावेळी आक्रमक नागरिकांनी संबंधीतांवर गुन्हा दाखल करा त्यानंतर रस्त्यावरचा माड हटवा असं सांगितले. त्यामुळे बराचवेळ वाहतूक ठप्प झाली. नागरिकांची भावना लक्षात घेऊन संबंधितावर गुन्हा प्रशासनच दाखल करणार आहे. केलल कृत्य निंदनीय आहे. लोकांच्या जीवीताशी खेळणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. यानंतर उपस्थितांनी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यास मान्यता दर्शविली. संबंधितावर कठोर कारवाई न झाल्यास प्रसंगी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. आज मरणारच होतो, त्यापेक्षा गुन्हाच अंगावर घेऊ असा गुर्भित इशारा संतप्त नागरिकांनी दिला.
पोलिस निरीक्षकांच्या आश्वासनाअंती नागरिक शांत झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात आला. भर पावसात या मोहीमेत नगरपरिषदेच्या पांडुरंग नाटेकर,गजानन परब, बाळा आंबेरकर, प्रवीण कांबळे, बाळा सावंत यांनी पुढाकार घेत रस्ता मोकळा करून दिला. पोलिस प्रविण वालावलकर, हनुमंत धोत्रे, मनोज राऊत यांनी त्यासाठी सहकार्य केलं. तर महावितरणचे चंद्रकांत निगुडकर, राजेश वेंगुर्लेकर, धनंजय मांजरेकर यांनी रस्त्यावरील लाईन बाजूला केल्या. तसेच विद्युत प्रवाह पुर्ववत करण्यासाठीच्या कामाला सुरूवात केली. याप्रसंगी संजय वरेरकर, आबा सावंत, विनोद सावंत, हिदायत खान, क्लेटस फर्नांडिस, संदीप नाईक आदी स्थानिकांनी देखील प्रशासनाला मदतीसाठी सहकार्य केले.