
कुडाळ : आयडीयल इंग्लिश मिडीयम इको स्कूल नेरूर येथे आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी सोहळा उत्साहात पार पडली.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थी विठ्ठल रखुमाई, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत दामाजीपंत, संत मीराबाई, कुर्मदास या संतांच्या वेशभूषेसह इतर विद्यार्थी वारकरी पोशाखात नेरूर चव्हाटा मारुती मंदिर ते श्री देव कलेश्वर मंदिर पर्यंत हरीनामाच्या जयघोषात वारकरी दिंडी घेऊन दाखल झाले होते. मंदिरात पोचल्यावर विद्यार्थ्यांनी भजन सादर केले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी अनुरा चौधरी हिने सुस्वर आवाजात ओव्या सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकली. संस्थेचे सचिव डॉ व्यंकटेश भंडारी यांनी अभंग गायन केले.
कार्यक्रमाचे नियोजन भूषण सारंग, चैतन्या चव्हाण, आरोही तारी, वैभव आकेरकर यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौरभ पाटकर व सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली. सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाच्या जयघोषात तल्लीन होऊन वारकरी दिंडीचा आनंद लुटला.