
मंडणगड : आषाढी एकादशी निमित्त शहरातील राजीव गांधी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. या वेळी शाळेतील लहानग्यांनी आकर्षक वेशभूषा करून शहरात काढलेली दिंडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीमध्ये विठ्ठल नामाचा, ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात अवघे मंडणगड शहर दुमदुमले. विठू माउलीचा गजर करत, टाळ वाजवत परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रशालेच्या सांस्कृतिक विभागातर्फे 'आषाढी एकादशी-पंढरीची वारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकादिशीच्या आदल्या दिवशी मंगळवारी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता शाळेपासून दिंडीला सुरवात झाली. शहर परिसर व बस स्थानक दरम्यान दिंडी काढण्यात आली. बस स्थानकात गोल रिंगण घेण्यात आले. यात नर्सरी, पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी बस स्थानक परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.शेडगे व उपमुख्याध्यापक श्री.महाजन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय खाडे, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी, पर्यवेक्षक श्री.बैकर यांनी यांनी विठू माऊलीच्या पालखीची पूजा केली. मंडणगडचे केंद्रप्रमुख राजेंद्र रेवाळे, संस्थेचे सरचिटणीस अँड. विनोद दळवी, संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन संतोष मांढरे यांनी दिंडी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.