स्वरांगीची शास्त्रीय नृत्यात चढती कमान - मिळवली बीटीएस शिष्यवृत्ती

कळसुलकर शाळेच्या विद्यार्थिनीचे सर्व स्तरांतून कौतुक
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 17, 2022 19:17 PM
views 179  views

सावंतवाडी  ः  येथील कळसुलकर शाळेची विद्यार्थिनी स्वरांगी खानोलकर हिला शास्त्रीय नृत्यातील बॉर्न टू शाईन ही ३ वर्षांसाठी असणारी ४.५ लाखांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

स्वरांगी इयत्ता नववीत शिकत आहे. झी एंटरटेंनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेट आणि गिव्ह इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतात ५ ते १५ वयोगटातील शालेय मुलींसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशी दोन टप्प्यांत विविध कलांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत भारतातील एकूण ३० मुलींची विविध कलांसाठी निवड करण्यात आली. यात शास्त्रीय नृत्य प्रकारात स्वरांगीची निवड करण्यात आली आहे. बांद्रा-मुंबई येथे झालेल्या सत्कार सभारंभात बॉर्न टू शाईन ही ३ वर्षासाठी असणारी ४.५ लाखाची शिष्यवृत्ती, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सध्या ती भरतनाटयम् नृत्याचे धडे घेत आहे. तिला तिचे गुरू तुळशीदास आर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिचे आई-वडील व संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै, सचिव डॉ. नार्वेकर, सर्व संचालक मंडळाकडून कौतुक करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक एन.पी. मानकर व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. पालक संघानेसुद्धा स्वरांगीच्या यशाबद्दल कौतुकाची थाप दिली  आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेकडून व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.