सिंधुदुर्गातील तब्बल 5,840 जण धान्य घेण्यास अपात्र

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 27, 2025 13:06 PM
views 989  views

सिंधुदुर्गनगरी : सलग सहा महिने धान्य उचल नाही, घरात चारचाकी, आयकर भरणारे तसेच एक लाखापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न आदी लाभार्थ्यांची जिल्हा पुरवठा विभागाने पडताळणी करून मयत आणि धान्य उचल न केलेल्या अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 840 कार्ड धारकांना मोफत धान्याच्या लाभासाठी अपात्र ठरविले आहे. मात्र ज्यांना पुन्हा धान्य हवे असल्यास त्यांना परत अर्ज करण्याची मुभा शासनाने ठेवलेली आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना दरमहा मोफत धान्याचा लाभ देण्यात येतो. 

सलग 6 महिने उचलचा नियम काय ?

सलग सहा महिने धान्य न उचलणाऱ्यांना रेशन दुकानातील धान्याची गरज नाही, असे समजून त्यांचे धान्य बंद होते, असा नियम आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाची पडताळणी सुरू असते.

7 हजार 408 रेशन कार्डधारकांची पडताळणी

शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार जिल्ह्यात 7 हजार 408  कार्ड पडताळणी करून, 5 हजार 840  रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना धान्याच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. 1 हजार 568 कार्ड धारकांनी धान्याची उचल करण्यास सुरुवात केली आहे. तर अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

1.88 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 47 हजार 324 लाभार्थी आहेत. त्यापैकी 4 लाख 58 हजार 748 लाभार्थ्यांची ई केवायसी करण्यात आली आहे. तर 1 लाख 88 हजार 576 लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. संबंधितांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे.

त्यांना पुन्हा संधी !

सहा महिन्यात धान्य उचल न केलेल्या 5 हजार 840 रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य योजनेतून वगळण्यात आले आहे. यात काही मयत लाभार्थी आहेत तर उर्वरिताना एनपीए म्हणजे केसरी मध्ये वर्ग करण्यात आले आहे. मात्र केसरी मध्ये वर्ग करण्यात आलेल्या कार्ड धारकांना शासनाने पुन्हा अर्ज करून धान्याची मागणी करण्याची संधी उपलब्ध ठेवली आहे